Kalyan Banerjee on Mahua Moitra
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील दोन खासदार कल्याण बॅनर्जी आणि महुआ मोईत्रा – यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. यावेळी कारण ठरले आहे कोलकात्यातील कायदा महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कल्याण बॅनर्जी यांनी दिलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यावर महुआ मोईत्रांनी केलेली अप्रत्यक्ष टीका.
ताज्या वादात कल्याण बॅनर्जी यांनी थेट खासदार महुआ मोईत्रांच्या वैयक्तिक आयुष्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला की, “महुआने 40 वर्षे स्थिर असलेलं एक कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि एका 65 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं. ती दुसऱ्यांना 'अँटी-वुमन' म्हणते, पण स्वतः काय आहे?”
हे वक्तव्य त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या पिनाकी मिश्रा (ओडिशातील बीजू जतना दलाचे माजी खासदार) यांच्याशी झालेल्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर केले.
बॅनर्जी पुढे म्हणाले, “जी महिला स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीच राजकारण करते, ती मला नैतिकतेवर भाषण देते!”
कोलकात्यात एका कायदा महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यावर बॅनर्जी म्हणाले होते की, “स्त्रिया कोणासोबत फिरत आहेत याची त्यांनी जाणीव ठेवायला हवी. ज्या मुली अशा लोकांबरोबर फिरतात, त्यांनी समजून घ्यायला हवं की त्या कोणासोबत आहेत. महिलांनी लक्ष द्यायला हवे की त्या कोणासोबत बाहेर पडत आहेत.”
बॅनर्जी यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि पीडितेच्या बदनामीचा आरोप झाला.
खा. महुआ मोईत्रांनीदेखील या वक्तव्याचा निषेध करत सोशल मीडियावर लिहिले की, “भारतामध्ये स्त्रीद्वेष सर्वच पक्षांमध्ये आहे. पण आमचा पक्ष (AITC) अशा विधानांचा निषेध करतो, मग ते कोणीही केले असो.”
यावर्षी 4 एप्रिल रोजी दिल्लीतील निवडणूक आयोग कार्यालयातही या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या वेळी महुआ मोईत्रांचे नाव TMC च्या निवेदनातून वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता.
काही दिवसांनी बॅनर्जी आणि किर्ती आझाद यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषण लीक झाले, ज्यात मोईत्रांचा उल्लेख "व्हर्सटाईल इंटरनॅशनल लेडी" असा केला गेला होता.
तृणमूल काँग्रेसने बॅनर्जींच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, पक्ष त्यांच्याशी सहमत नाही.” मात्र, या विधानांमुळे पक्षातील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे.