Tooth Extraction Death file photo
राष्ट्रीय

Tooth Extraction Death: धक्कादायक! दात काढल्यानंतर ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू; डेंटल क्लिनिकमध्ये नेमकं काय घडलं?

दातावरील उपचार एका ३५ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tooth Extraction Death:

झारखंड: दातावरील उपचार एका ३५ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील पलामू जिल्ह्यात घडली आहे. दातांच्या खासगी दावाखान्यात दात काढल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान चुकीच्या इंजेक्शन किंवा औषधांमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला असून पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले मुकेश चंद्र भारती यांच्या पत्नी बिंजती देवी (वय ३५) यांचा दात दुखत होता. दात अर्धवट तुटलेला होता आणि त्यामुळे त्रास होत होता. याआधी उपचार घेतलेल्या गावातील काही लोकांनी संबंधित डॉक्टरची माहिती दिल्याने बिंजती या मंगळवारी सकाळी पलामू येथील 'जनता डेंटल क्लिनिक' मध्ये गेल्या. तिथे अश्रफ अली नावाच्या व्यक्तीने बिंजती यांची तपासणी केली.

पती मुकेश भारती यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, "डॉक्टरांनी रक्तदाब आणि शुगर तपासल्यानंतर दात काढण्याचा निर्णय घेतला. दात काढण्यापूर्वी भूल देण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. दात काढल्यानंतर साधारण तासाभराने काही औषधे लिहून दिली आणि कंपाऊंडरला एक इंजेक्शन देण्यास सांगितले."

इंजेक्शन देताच प्रकृती खालावली

तक्रारीत म्हटले आहे की, कंपाऊंडरने इंजेक्शन देताच बिंजती यांना उलट्या सुरू झाल्या आणि त्यांची प्रकृती वेगाने बिघडू लागली. घाबरलेल्या पतीने ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर डॉक्टरांनी पुन्हा दोन इंजेक्शन टोचली. काही मिनिटांतच बिंजती यांचा चेहरा पांढरा पडला आणि त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले.

रुग्णाला सोडून डॉक्टर फरार

महिलेची अवस्था पाहून डॉक्टरांनी रुग्णवाहिका आणतो असे सांगितले, पण मदत करण्याऐवजी तो क्लिनिकला कुलूप लावून तिथून पसार झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

संबंधित क्लिनिक सील करण्यात असून संबंधित डॉक्टर बोगस असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी हरिहरगंज पोलीस ठाण्यात पतीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT