TMC leaders join BJP Pudhari
राष्ट्रीय

TMC leaders join BJP : ममता बॅनर्जींना मोठा धक्का: तृणमूल काँग्रेसचे तीन माजी राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील

आगामी काळात तृणमूलला आणखी मोठे खिंडार पडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

TMC leaders join BJP : तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) अंतर्गत बंडखोरी तीव्र झाली आहे. पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणारे माजी नेते सुश्मिता देव, सुखेंदू शेखर रॉय आणि प्रकाश चिक बरैक यांनी आज (दि. ९ जुलै) कोलकाता येथे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. कोलकाता येथील सॉल्ट लेक भागात असलेल्या भाजप कार्यालयात पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या तिन्ही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. भट्टाचार्य यांनी या तिघांना भाजपचा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या राजकीय अनुभवामुळे राज्यात भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

तृणमूल काँग्रेसमधील संकट आणखी गडद

पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या एका मोठ्या गटाने बंडखोरी केल्यानंतर तृणमूलमधील फूट वाढली. अनेक खासदारांनीही या बंडखोर गटाला पाठिंबा दिला आहे. बंडखोर खासदारांनी संसदेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केली असून, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठकाही घेतल्या आहेत. यामुळे आगामी काळात तृणमूलला आणखी मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जनता सर्व पाहत आहे : कुणाल घोष

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल घोष म्हणाले की, पक्षाने सुखेंदू शेखर रॉय यांना अशा राजकीय संधी दिल्या ज्या त्यांना तृणमूलमध्ये येण्यापूर्वी कधीही मिळाल्या नव्हत्या. सर्वसामान्यांना ठाऊक आहे की, ज्येष्ठ नेते असलेले सुखेंदू शेखर २०११ पूर्वी कधीही खासदार किंवा आमदार झाले नव्हते. त्यांचा आदर ठेवून ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवले. आज ते भाजपमध्ये गेले आहेत. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना त्यांनी पक्ष सोडला नाही, जनता हे सर्व पाहत आहे."

२० लोकसभा खासदार बंडखोरांच्या गोटात?

गेल्या काही आठवड्यांत तृणमूल काँग्रेसमधील संकट अधिकच गहिरे झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तृणमूलचे सुमारे २० लोकसभा खासदार रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाच्या संपर्कात आहेत. या बंडखोर गटाने आपणच "खरी तृणमूल काँग्रेस" असल्याचा दावा केला असून, काँग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे बंडखोर गटावर विश्वासघाताचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, "ज्या तृणमूल नेत्यांनी पक्षाशी गद्दारी केली आणि भाजपची हातमिळवणी केली, त्यांना जनतेने कधीही माफ करू नये. दोन बोटींवर स्वार होण्याचा प्रयत्न करू नका; अजूनही वेळ आहे, मागे वळून पाहा आणि या क्रूरतेचा विचार करा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT