ISIS Terrorist Arrest
अहमदाबाद : संपूर्ण देशाला हादरवून टाकण्याच्या आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी करण्याच्या उद्देशाने ईसिसच्या दहशतवाद्यांनी रचलेला कट गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने उधळून लावला. गुजरात एटीएसने केलेल्या थरारक कारवाईत तीन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात यश आले. त्यांच्या ताब्यातून दोन ग्लॉक पिस्तूल, एक बेरेटा पिस्तूल, 30 जिवंत काडतुसे आणि रिसिन विष बनवण्यासाठी लागणारे 4 लिटर एरंडेल तेल जप्त करण्यात आलेे. अटक केलेल्या तिघांचा अधिक तपास सुरू असून, एकाला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद, मोहम्मद सुहेल आणि आझाद या तिघांना अदालज टोल नाक्याजवळून अटक करण्यात आली. हे तिघेजण शस्त्रास्त्रे पुरवठा करत असतानाच एटीएसच्या जाळ्यात अडकले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींची योजना देशातील विविध भागांमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची होती.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अटक केलेल्या आरोपींपैकी डॉ. अहमद सय्यद याने चीनमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी खुलासा केला की, हा डॉक्टर विदेशी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. विशेषतः अबू खडेजा नावाच्या टेलिग्राम आयडीद्वारे त्याचा ‘इस्लामिक स्टेट’ खोरासानशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
या डॉक्टरने एरंडेलच्या बियांपासून रिसिन नावाचे अत्यंत विषारी रासायनिक विष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या धोकादायक कटाची अंमलबजावणी करण्यासाठीच त्याने कालोल येथे शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी घेण्यासाठी हजेरी लावली होती.
या कटात सामील असलेले इतर दोन आरोपी, आझाद आणि मोहम्मद सुहेल उत्तर प्रदेशातील आहेत. आझाद हा लखीमपूर आणि सुहेल हा शामली येथील रहिवासी आहे. दोन्ही आरोपींना दीनी शिक्षण देण्यात आले असून ते कट्टरपंथी बनले आहेत. त्यांच्यावर परदेशातील दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवल्याचा आरोप आहे.
एटीएसने केलेल्या चौकशीत हे समोर आले आहे की, या टोळीने लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी हल्ल्यापूर्वी रेकी केली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या हालचाली काश्मीरमध्ये देखील नोंदवल्या गेल्या आहेत. शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी राजस्थानमधील हनुमानगड येथून घेण्यात आली आणि नंतर ती कलोल येथे पोहोचवण्यात आली होती.
या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ड्रोनद्वारे शस्त्रपुरवठा होत असल्याचा संशय आहे. या तिघांचे मास्टरमाईंड पाकिस्तानात असून ते त्यांच्याशी टेलिग्राम आयडीवरून संपर्कात असत. पाकिस्तानशिवाय सीरिया आदी देशांतील इस्लामिक स्टेटच्या म्होरक्यांशी त्यांचा संपर्क असण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या काही संशयितांशी त्यांचा संपर्क असल्याची माहिती पुढे येत आहे.
रिसिन हे अत्यंत जहाल विष विविध पाणी साठ्यात मिसळून त्याद्वारे मोठा नरसंहार घडवण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी हे विष बनवण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच या तिघांच्या मुसक्या आवळल्याने हा कट उधळला गेला आहे.