Moong MSP Protest: मध्य प्रदेशात मूग पिकाच्या 100 टक्के किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. हजारो शेतकरी आठवडाभर पुरेल इतके जेवन, धान्याचे पोते, अंथरूण-पांघरूण आणि स्वयंपाकाची भांडी घेऊन भोपाळच्या बाहेरील भागात दाखल झाले आहेत. सावरकर सेतू परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, सरकारने मागण्या मान्य करेपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) नेतृत्वाखाली 19 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. दरम्यान, आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने भोपाळमधील काही भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, प्रभावित परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या आंदोलनाची दखल घेत मध्य प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. राज्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री ऐदल सिंह कंसाना यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र लिहून राज्यातील संपूर्ण मूग उत्पादन MSP वर खरेदी करण्याची मागणी केली आहे.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, 14 मे ते 3 जुलै 2026 या कालावधीत मध्य प्रदेशात सुमारे 8.06 लाख मेट्रिक टन मूग उत्पादन झाले आहे. मात्र सध्या केवळ 4.54 लाख मेट्रिक टन खरेदीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी MSP च्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मसूर या डाळींची 100 टक्के MSP वर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मूग खरेदी अजूनही प्राईस सपोर्ट स्कीम (PSS) अंतर्गत केली जाते. या योजनेत राज्याच्या अंदाजित उत्पादनाच्या केवळ 25 टक्क्यांपर्यंतच खरेदीची मर्यादा असल्याने उर्वरित उत्पादन खुल्या बाजारात विकावे लागते.
खुल्या बाजारात मूगाला 2026-27 हंगामासाठी निश्चित करण्यात आलेल्या ₹8,768 प्रति क्विंटल MSP पेक्षा कमी दर मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकरी नेते संतोष पाटवारी यांनी सांगितले की, गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी संघटना सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनाची सुरुवात नर्मदापुरम येथील सेठाणी घाटावरून झाली. सुरुवातीला प्रशासनाने शेतकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखले होते. त्यामुळे शेतकरी तेथेच धरणे आंदोलनाला बसले. नंतर तणाव वाढताच प्रशासनाने काही ठिकाणचे अडथळे हटवले आणि मोर्चा पुढे सरकला.
यानंतर शेतकरी ओबेदुल्लागंज आणि रायसेन मार्गे भोपाळच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, मंडीदीप सीमेवर, टोल नाक्यांवर आणि शहराच्या प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
हे आंदोलन केवळ मूग खरेदीपुरते मर्यादित नसून, मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील वाढत्या असंतोषाचेही प्रतीक मानले जात आहे. शेतकरी संघटनांच्या मते, गेल्या काही हंगामांपासून पिकांची खरेदी उशिरा होणे, खरेदीवरील मर्यादा, नोंदणीतील अडचणी आणि खतांचा तुटवडा या समस्या कायम आहेत.
याशिवाय शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असल्याने चांगले उत्पादन घेऊनही अनेक शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विकावा लागत आहे. त्यामुळे MSP वर 100 टक्के मूग खरेदीची मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत.