राष्ट्रीय

Nasal Vaccine : नाकावाटे घ्यावयाची लस बूस्टर डोस घेतलेल्यांसाठी नाही, एनटीएजीआयची माहिती

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने भारत बायोटेकने विकसित केलेली नाकावाटे घ्यावयाची लस बूस्टर डोस घेतलेल्यांसाठी नाही, असे नॅशनल टेक्निक अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनकडून सांगण्यात आले आहे. देशातील व्हॅक्सिन टास्क फोर्स म्हणून एनटीएजीआयला ओळखले जाते.

ज्या लोकांनी आधी कोरोना नियंत्रणासाठीचे बूस्टर डोस घेतलेले आहेत, त्यांना नाकावाटे घ्यावयाची लस देण्याचे काहीही कारण नाही, असे एनटीएजीआयचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारत बायोटेकची "इन्कोवॅक" नझल लस गेल्या आठवड्यात को-विन प्लॅटफार्मवर नोंदणीकृत करण्यात आली होती.

"इन्कोवॅक" नझल लस ही पहिल्या बूस्टर डोसच्या स्वरुपात कार्य करेल, असे डॉ. अरोरा यांनी स्पष्ट केले. एनटीएजीआय नवीन लसींवर काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

को-विन प्लॅटफॉर्मवर तीनपेक्षा जास्त लस घेतल्याची नोंद करण्याची सुविधा असणार नाही. याचे कारण जर वारंवार लस घेतली तर मनुष्याची अॅंटीजन तयार करण्याची क्षमता एकतर संपते किंवा ती अत्यंत कमी होते, असे अरोरा यांनी नमूद केले. "इन्कोवॅक" ही पूर्णपणे सुरक्षित लस असून या लसीचे चार थेंब नाकात घातले जातात, असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT