PM Modi Bikaner Visit  
राष्ट्रीय

PM Modi Bikaner Visit | 'जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले, त्यांना मातीत गाडण्यात आले'; PM मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी आज राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

दीपक दि. भांदिगरे

PM Modi Bikaner Visit

'ऑपरेशन सिंदूर'वर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.२२) पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. ''जे सिंदूर पुसण्यासाठी निघाले होते; त्यांना मातीत गाडण्यात आले. ज्यांनी हिंदुस्तानचे रक्त सांडले; आज त्यांचा हिशोब चुकता झाला. भारत गप्प राहील अस ज्यांना वाटत होते ते आज त्यांच्या घरात लपून बसले आहेत. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा गर्व होता ते आज त्याच्याच ढिगाऱ्यात गाडले गेले आहेत.'' असा शब्दांत पीएम मोदी यांनी पाकिस्तानला सुनावले.

आता भारताची भूमिका स्पष्ट आहे...प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानचे सैन्य, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागेल.'' असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला.

'मोदींच्या धमन्यांमध्ये रक्त नाही, तर लखलखता सिंदूर वाहतोय'

पंतप्रधान मोदी आज राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी आज देशनोके येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, पाकिस्तान एक गोष्ट विसरला आहे की आता भारतमातेचा सेवक मोदी येथे ताठ मानेने उभा आहे. मोदींचे चित्त शांत आहे, ते शांतच राहते, पण मोदींचे रक्त सळसळते आहे. आता मोदींच्या धमन्यांमध्ये रक्त नाही, तर लखलखता सिंदूर वाहत आहे.

आता केवळ PoK वर चर्चा

आता पाकिस्तानसोबत कसलाही व्यापार आणि चर्चा होणार नाही. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

दहशतवाद नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरने तीन सूत्रे निश्चित केली आहेत. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यासाठी वेळ आपले सैन्य निश्चित करेल. दुसरे सूत्र म्हणजे, भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही. तिसरे - आम्ही दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे समजणार नाही. आम्ही ते एकच आहेत असे मानू. पाकिस्तानचा स्टेट आणि नॉन- स्टेट ॲक्टरवाला खेळ आता चालणार नाही, असे पीएम मोदींनी सुनावले.

दहशतवादाला चिरडून टाकण्याची हीच नीती आहे, हीच पद्धत आहे. हा भारत आहे, नवा भारत आहे, अशी गर्जना त्यांनी केली.

जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी घालणे सुरू ठेवले तर त्याला हक्काचे पाणी मिळणार नाही. भारतीयांच्या रक्ताशी खेळणे, आता पाकिस्तानला खूप महागात पडेल, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT