भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी (दि.१३) पूर्व लडाखसह देशाच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीबद्दल माहिती दिली.  (Image source- ANI)
राष्ट्रीय

'LAC वरील परिस्थिती संवेदनशील, पण स्थिर! J&K मध्ये मारले गेलेले ६० टक्के दहशतवादी पाकचे'

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली माहिती

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi) यांनी सोमवारी (दि.१३) पूर्व लडाखसह देशाच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीबद्दल माहिती दिली. भारताच्या उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमधील देपसांग आणि देमचोकमधील परिस्थिती निवळली. या दोन्ही ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही द्विवेदी यांनी सांगितले.

द्विवेदी पुढे म्हणाले, "पूर्व लडाखमधील (eastern Ladakh) परिस्थिती संवेदनशील आहे. पण स्थिर आहे. एलएसीवरील सैन्य तैनाती समतोल आणि मजबूत आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. उत्तरेकडील सीमांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे युद्ध प्रणालीमध्ये विशिष्ट तंत्रज्ञानाचा समावेश शक्य झाला आहे."

२०२० मध्ये चीनच्या घुसखोरीमुळे भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चार वर्षांच्या तणावाच्या परिस्थितीनंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये सैनिकांमध्ये झटापट झाली होती. गलवान खोऱ्यातही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. यात २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देश मागे हटण्यावर सहमत झाले. या प्रदेशातील तणाव अजूनही पूर्ण निवळलेला नाही. येथील परिस्थितीबाबत बोलताना द्विवेदी म्हणाले की, सीमा भागात पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जात आहे.

'जम्मू-कश्मीरमध्ये सक्रिय ८० टक्के दहशतवादी पाकिस्तानी'

जम्मू-कश्मीरमध्ये सक्रिय असलेले ८० टक्के दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत, असे लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी म्हटले आहे. "जम्मू आणि काश्मीरमध्ये मारण्यात आलेले ६० टक्के दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत. राज्यात सक्रिय असलेले ८० टक्के दहशतवादीदेखील पाकिस्तानीच आहेत, तेही अशा वेळी जेव्हा आपण दहशतवादाकडून पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत." असे त्यांनी नमूद केले.

काश्मीरमधील हिंसाचाराचे मूळ पाकिस्तानात आहे. येथे हिंसाचाराचे प्रमाण कमी झाले आहे. स्थानिक नागरिकांना शांतता हवी आहे. एकूणच जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर संघर्षविराम सुरू आहे. पण तरीही घुसखोरीचा प्रयत्न केला जात असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT