बंगळूर : बंगळूरमधील व्हाईट फील्डजवळील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कुकर बॉम्बस्फोटामागे असलेल्या एनआयए पोलिसांच्या पथकाला धक्कादायक माहिती मिळाली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये लपलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा रामेश्वरम कॅफे स्पॉटचा मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आले आहे. दहशतवादी फरहातुल्ला घोरी याने बंगळूरमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्लीपर सेलद्वारे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने स्फोट घडवून आणला, असे तपास पथकातील सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतात स्लीपर सेलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी तोडफोडीची कृत्ये करण्याची योजना आखल्याचेही समोर आले आहे. दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा कुकर बॉम्ब बनवण्यात निपुण असून स्लीपर सेलच्या दहशतवाद्यांना हे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अटक केलेल्या दहशतवाद्याने या स्लीपर सेलचा वापर करून देशातील अनेक रेल्वे स्थानकांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.