राष्ट्रीय

S Jaishankar vs Pakistani Journalist: ‘दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारतोय?’; पाक पत्रकाराला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी धुतले

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पुन्हा चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा आपल्या हजरजबाबी आणि आक्रमक मुत्सद्देगिरीने एका पाकिस्तानी पत्रकाराला चोख प्रत्युत्तर देत निरुत्तर केले. दक्षिण आशियातील दहशतवादाच्या मुद्द्यावरून कांगावा करत भारतावरच उलट आरोप करणाऱ्या या पत्रकाराची कानउघाडणी करताना, ‘एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारतोय?’ असा जोरदार टोला जयशंकर यांनी लगावला. त्यांचे हे सडेतोड उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये शांतता पसरली, तर आपले म्हणणे पूर्ण करून जयशंकर स्मितहास्य करत पुढे निघून गेले.

पाकिस्तानी पत्रकाराने नेमके काय विचारले?

हा संपूर्ण प्रसंग त्या वेळी घडला, जेव्हा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लायबेरियाच्या प्रतिनिधींसोबत आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेबाबत माध्यमांशी संवाद साधत होते. पत्रकार परिषदेच्या अखेरीस एका पाकिस्तानी पत्रकाराने अत्यंत नाट्यमयरीत्या दक्षिण आशियातील दहशतवादाचा संदर्भ देत पाकिस्तानच्या नेहमीच्या भूमिकेनुसार भारतावर थेट आरोप करण्यास सुरुवात केली. त्याने विचारले, ‘तुमचे सरकार पाकिस्तानात दहशतवाद पसरवणे कधी थांबवणार आहे, हे तुम्ही सांगू शकता का? तुमचे सरकार आमच्या प्रमुख नेत्यांना का लक्ष्य करू इच्छिते? भारताकडून पाकिस्तानात सुरू असलेल्या कारवाया कधी थांबतील?’

जयशंकर यांची शांत पण भेदक प्रतिक्रिया

पाकिस्तानी पत्रकाराच्या या उथळ आणि चिथावणीखोर प्रश्नावर जराही विचलित न होता डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या नेहमीच्या शांत व उपरोधिक शैलीत हसतमुखाने पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, ‘एक दहशतवादी देश मला हा प्रश्न विचारत आहे?’ या एकाच वाक्यात संपूर्ण प्रकरणाची हवा काढत त्यांनी संबंधित पत्रकाराला आरसा दाखवला आणि परिषदेचे कामकाज आटोपून ते पुढील बैठकीसाठी रवाना झाले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा पुन्हा चव्हाट्यावर

दहशतवादाला खतपाणी घालून स्वतः मात्र पीडित असल्याचा आव आणणे, हे पाकिस्तानचे जुनेच धोरण राहिले आहे. भारतासह जगभरात हिंसक कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांना स्वतःच्या भूमीत सुरक्षित आश्रय देणे आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्वतःलाच बळी दाखवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे, हा पाक लष्कराचा दशकांपासूनचा अजेंडा राहिला आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जयशंकर यांनी अवघ्या एका वाक्यात पाकिस्तानच्या या दांभिक प्रचाराचा पुरता बुरखा फाडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT