Radhika Yadav Murder file photo
राष्ट्रीय

Radhika Yadav Murder : मुलीच्या जीवावर जगतो..., लोकांचे टोमणे आणि ...; टेनिसपटू राधिकाच्या हत्येच वडिलांनी सांगितलं धक्कादायक कारण

Gurugram Murder News : गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली. एफआयआरमध्ये आरोपी पित्याने धक्कादायक कारण सांगितले आहे.

मोहन कारंडे

नवी दिल्ली : गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिसपटू असलेल्या राधिका यादव या २५ वर्षीय मुलीची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले. गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राधिका स्वयंपाकघरात काम करत असताना वडिलांनी पाच गोळ्या झाडल्या. या हत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

वडील दीपक यादवने गुरुग्राम पोलिसांसमोर स्वतः गुन्हा कबूल करताना सांगितले की, त्याला गावातील लोक मुलीच्या कमाईवरून टोमणे मारायचे. तो मुलीच्या कमाईवर जगतो, असे त्याला म्हटले जायचे. यामुळे दीपकला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याने सांगितले की, त्याची मुलगी राधिका एक उत्कृष्ट टेनिसपटू होती, तिने अनेकवेळा राष्ट्रीय स्तरावर ट्रॉफी जिंकली होती. मात्र, खांद्याला दुखापत झाल्यामुळे ती खेळापासून दूर होती आणि तिने स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली होती.

रील्स आणि अकॅडमीला होता विरोध

एफआयआरनुसार, दीपक यादव केवळ अकॅडमीमुळेच नव्हे, तर राधिकाच्या सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या सवयीमुळेही नाराज होता. या सर्वांमुळे आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे, असे त्याला वाटत होते. जेव्हा त्याने राधिकाला अकॅडमी बंद करण्यास सांगितले, तेव्हा तिने नकार दिला. यानंतर दीपक सतत मानसिक तणावाखाली राहू लागला. एफआयआरमध्ये त्याने सांगितले की, जेव्हा तो दूध घेण्यासाठी वजीराबाद गावात जायचा, तेव्हा लोक राधिकाच्या सोशल मीडियावरील वावरावरुन आणि अकॅडमीवरून टोमणे मारायचे, ज्यामुळे त्याला राग यायचा.

५ गोळ्या झाडून केली हत्या, आई होती खोलीत

घटनेच्या दिवशी सकाळी दीपकने आपली रिव्हॉल्व्हर काढली आणि राधिका स्वयंपाकघरात असताना तिच्या कमरेच्या मागून तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी घराच्या पहिल्या मजल्यावर दीपक, त्याची पत्नी मंजू यादव आणि मुलगी राधिका तिघेच होते. एफआयआरनुसार, मंजू यादव आजारी असल्यामुळे आपल्या खोलीत आराम करत होत्या. त्यांना फक्त गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला होता.

रक्ताच्या थारोळ्यात पडली होती राधिका

गोळीचा आवाज ऐकून दीपकचा भाऊ कुलदीप यादव आणि त्याचा मुलगा पीयूष तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिले की राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि ड्रॉईंग रूममधील टेबलावर रिव्हॉल्व्हर ठेवलेली होती, ज्यात गोळ्यांची पाच रिकामी पुंगळी आणि एक जिवंत काडतूस होते. राधिकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राधिकाच्या काकांनी, कुलदीप यांनी, राधिकाची हत्या आपल्या भावानेच केली असावी, अशी शंका पोलिसांकडे व्यक्त केली होती. त्यांच्याच तक्रारीवरून पोलिसांनी दीपकविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांचा खुलासा, गुन्हा कबूल

चौकशीदरम्यान दीपक यादवने आपला गुन्हा कबूल केला. मात्र, त्याची पत्नी मंजू यादव यांनी जबाब देण्यास नकार दिला आणि सांगितले की, त्या आजारी होत्या आणि हे सर्व कसे घडले याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. त्यांच्या पतीने मुलीला गोळी का मारली हे माहित नाही, तिचे चारित्र्य चांगले होते, असे त्यांनी केवळ तोंडी सांगितले.

आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न

सुरुवातीला कुटुंबीयांनी राधिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी चौकशी केली आणि घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. त्यानंतर दीपकने सत्य सांगितले. घटनेच्या वेळी घरात तो, राधिका आणि त्याची पत्नी मंजू उपस्थित होते, तर प्रॉपर्टी डीलर असलेला मुलगा आपल्या कार्यालयात गेला होता. पोलिसांनी दीपक विरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT