High Court file photo
राष्ट्रीय

High Court: पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला कोर्टाने फक्त ५०० रुपयांच्या दंडावर का सोडले?

रागाच्या भरात पतीवर चाकूने वार करून त्याची हत्या करणाऱ्या एका महिलेची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयाने सौम्य केली आहे.

मोहन कारंडे

Telangana High Court wife killed husband case

नवी दिल्ली: कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पतीवर चाकूने वार करून त्याची हत्या करणाऱ्या एका महिलेची शिक्षा तेलंगणा उच्च न्यायालयाने सौम्य केली आहे. न्यायालयाने या महिलेची चार वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा रद्द करत, तिला ५०० रुपये दंड ठोठावून तिची सुटका केली. पतीकडून सतत होणारा छळ आणि अचानक झालेला वादावादीतून ही घटना घडल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निर्णय दिला.

मृत पती आपल्या मुलांसाठी खजूर घेऊन सासरच्या घरी गेला होता. तिथे पती-पत्नीत वाद झाला आणि तो तिथून निघून गेला. मात्र, काही वेळाने तो विवस्त्र अवस्थेत पुन्हा सासरच्या घरी परतला आणि पत्नीसह तिच्या कुटुंबीयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमक्या देऊ लागला, असा आरोप आहे. यादरम्याने झालेल्या झटापटीत महिलेने एक चाकू उचलला आणि त्याच्यावर वार केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या प्रकरणात पत्नीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केले की, ही हत्या पूर्वनियोजित नव्हती किंवा जीवे मारण्याचा कोणताही पूर्वहेतू नव्हता. त्याऐवजी, तिला IPC च्या कलम ३०४ (भाग २) अन्वये दोषी ठरवण्यात आले. हे कलम सदोष मनुष्यवध जो हत्या या संज्ञेत येत नाही, या गुन्ह्याशी संबंधित आहे. या कलमांतर्गत तिला चार वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

न्यायालयाचा कोणता कायदा ठरला फायदेशीर?

महिलेने केलेल्या अपीलावर सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०० मधील अपवाद ४ चा आधार घेतला. या नियमानुसार, जर कोणतीही हत्या पूर्वनियोजन नसेल, अचानक झालेल्या वादातून, रागाच्या भरात आणि आरोपीने कोणतीही क्रूरता न दाखवता केली असेल, तर त्याला खून मानले जात नाही.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, महिलेचा कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता, तर त्यावेळी रागाच्या भरात तिच्याकडून हे पाऊल उचलले गेले. चाकूने वार केल्यामुळे मृत्यू होऊ शकतो याची जाणीव तिला नक्कीच होती, त्यामुळे तिचा गुन्हा कायम ठेवण्यात आला; परंतु परिस्थिती पाहता शिक्षेबाबत सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले.

पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा का झाली नाही?

कनिष्ठ न्यायालयाने त्या महिलेला मूळतः चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. तिच्या अपिलावर सुनावणी करताना, न्यायालयाने या घटनेशी संबंधित परिस्थितीचा सखोल विचार केला आणि तिला आणखी तुरुंगवासाची शिक्षा न देण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी, न्यायालयाने तिची मूळ शिक्षा बदलून केवळ ५०० रुपयांच्या दंडापर्यंत मर्यादित केली. हा दंड मूळ आदेशाचाच एक भाग होता आणि तो दंड त्या महिलेने यापूर्वीच भरलेला होता.

कोणत्या वादातील हत्येला माफी मिळते?

न्यायालयाच्या या निर्णयाचा अर्थ असा नाही की, भांडणादरम्यान केलेली प्रत्येक हत्या माफ केली जाईल. भारतीय कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून आरोपीचा हेतू, हत्येचे नियोजन, वापरलेले शस्त्र आणि हल्ल्याची तीव्रता या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाते. जर तपासामध्ये हत्येचा पूर्वहेतू स्पष्ट झाला, तर कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेचीच तरतूद लागू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT