Delhi Aastha Kunj Park Crime Pudhari
राष्ट्रीय

Delhi Crime: वाढदिवशी मी मंदिरात गेले अन्....; अत्याचार पीडित मुलीने सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Delhi Aastha Kunj Park Crime: पोलिस असल्याचे भासवून आरोपींनी तिच्या मित्राला मारहाण केली आणि दोघांचे मोबाईल काढून घेतल्याचा आरोप आहे.

Rahul Shelke

Delhi Aastha Kunj Park Crime: दिल्लीतील आस्‍था कुंज पार्कमध्ये मित्रासोबत गेलेल्या १७ वर्षीय मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलिस असल्याचे भासवत आरोपींनी मुलीच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर दोघांचे मोबाईल काढून घेत चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत मुलीला पार्कमधील निर्जन भागात नेल्याचा आरोप आहे.

याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २२ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तिला कालकाजी मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. त्यासाठी ती एका मित्रासोबत सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता कालकाजी परिसरात पोहोचली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर रात्री सुमारे ७ वाजता दोघांनी कालकाजी मेट्रो स्थानकाबाहेरून चिप्स आणि पाण्याची बाटली घेतली.

यानंतर दोघे आस्‍था कुंज पार्कमध्ये गेट क्रमांक ७ मध्ये गेले. काही वेळ पार्कमध्ये बसून काहीतरी खाऊन त्यानंतर इस्कॉन मंदिरात जाण्याचा त्यांचा प्लॅन होता.

मात्र, पार्कमध्ये बसल्यानंतर काही वेळातच सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तीन पुरुष त्यांच्याजवळ आले. मुलीच्या जबाबानुसार, त्यांनी तिच्या मित्राला पकडून मारहाण केली. दोघांनी आपण पोलिस असल्याचे सांगत रात्रीच्या वेळी पार्कमध्ये का आले, अशी विचारणा केली.

यानंतर आरोपींनी दोघांचे मोबाईल फोन काढून घेतले. दोन आरोपींनी मुलीला पार्कमधील झुडपांच्या दिशेने जाण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलीने त्यांना आपण जे काही विचारायचे आहे ते इथेच विचारा आणि आपल्या आईशी बोलण्याची विनंती केली.

तिच्या जबाबानुसार, याच वेळी एका आरोपीने दुसऱ्याला ‘असीफ भाई, बंदूक काढ’ असे सांगितले. असीफ नावाचा आरोपी जांभळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता आणि तो तिघांमध्ये शरीराने अधिक मजबूत असल्याचे मुलीने सांगितले. त्याने जीन्सच्या खिशातून काळ्या रंगाची बंदूक काढून दाखवल्याचा आरोप आहे.

यानंतर दोन आरोपींनी चाकू काढले आणि मुलीला पार्कमधील अंधाऱ्या भागात नेले. तिथे तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात केला आहे. अत्याचारादरम्यान आरोपींनी तिच्या गळ्याजवळ चाकू धरून धमकावल्याचेही तिने सांगितले.

“मी रडत होते आणि मला खूप वेदना होत होत्या,” असे मुलीने पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे.

तिच्या जबाबानुसार, पहिल्या आरोपीने अत्याचार केल्यानंतर दुसऱ्या आरोपीला जवळ बोलावले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिसरा आरोपीही तेथे आला आणि त्यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे.

घटनेनंतर आरोपींनी मुलीला कपडे घालण्यास सांगितले. मात्र, तिचे अंतर्वस्त्र परत दिले नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तिच्या मित्राला पुन्हा तिच्याजवळ आणण्यात आले.

आरोपींनी दोघांचे मोबाईल फोन परत केले. मात्र, या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी दोघांना पार्कमधून बाहेर जाण्यास भाग पाडले.

पार्कबाहेर आल्यानंतर मुलीने आपल्या मित्राला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मित्राने पोलिसांच्या PCR क्रमांकावर फोन केला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून वापरलेले कंडोम जप्त केल्याचे वृत्त आहे. पीडितेने पोलिसांना दिलेली आरोपींची टोपणनावे, त्यांनी घातलेले कपडे आणि त्यांच्या शारीरिक वर्णनाच्या आधारे तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT