राष्ट्रीय

Viral Post : "मला तुझ्‍या JEE रँकची पर्वा नाही.." : IIT दिल्लीच्या पदवीधराला नोकरी नाकारली!

सर्वसाधारण कॉलेजमधील विद्यार्थ्याकडे असणार्‍या कौशल्‍याचे कौतूक, सोशल मीडियावर रंगला वाद

पुढारी वृत्तसेवा

tech recruiter's LinkedIn post Viral

नवी दिल्‍ली : एका आयटी कंपनीत कर्मचारी निवडणार्‍याने (रिक्रूटर) आयआयटी दिल्लीच्या पदवीधराऐवजी एका सर्वसाधारण कॉलेजमधील पदवीधर तरुणास नोकरीसाठी निवडले. ही निवड का केली?, याबद्दलची माहिती लिंक्डइन पोस्टमध्ये शेअर केली आहे. ही पोस्‍ट व्‍हायरल होताच आयआयटी पदवीधर आणि सर्वसामान्‍य कॉलेजमधील पदवीधराच्‍या तुलनेवरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.

'काय बनवले, बिघडवले किंवा दुरुस्त केले हे महत्त्‍वाचे..

आयआयटी पदवीधरला नाकारल्‍यानंतर रिक्रूटर केलेल्‍या लिंक्डइन पोस्टमध्ये म्‍हटलं आहे की, "मला तुझ्‍या जेईई रँकची पर्वा नाही, तर उमेदवाराने 'काय बनवले, बिघडवले किंवा दुरुस्त केले' आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस आहे. आज मी एका आयआयटी दिल्लीच्या पदवीधराला नाकारले. एका अशा कॉलेजमधून आलेल्या उमेदवाराला नोकरी दिली, ज्याचे नाव तुम्ही कधी ऐकलेही नसेल."

आयआयटी पदवीधराचे नेमकं काय चुकलं?

तुमच्या मोठ्या डिग्रीपेक्षा तुम्ही प्रत्यक्ष काय काम करू शकता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आयआयटी (IIT) ग्रॅज्युएट पदवीधराचे कॉम्प्युटर कोडिंगमधलं रेटिंग खूप चांगलं होतं; पण जेव्हा त्याला विचारलं की त्याने बनवलेला कॉलेज प्रोजेक्ट एकाचवेळी 100 लोक कसे वापरू शकतात, तेव्हा तो व्यवस्थित समजावून सांगू शकला नाही. साध्या कॉलेजमधून पदवी घेतलेल्‍या तरुणाने स्वतःची एक पेमेंट सिस्टीम बनवली. ती सिस्टीम एका दिवसात 50 हजार व्यवहार हाताळू शकते. त्याने ती सिस्टीम सुरू केली , तिची क्षमता वाढवली, ती बिघडल्यावर दुरुस्तही केली. म्हणजे त्याने 'प्रत्यक्ष' काम करून दाखवलं, असेही रिक्रूटरने पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

कंपन्या फक्त अल्गोरिदमची कोडी सोडवण्यासाठी पैसे देत नाहीत

आयआयटीच्या मुलाच्या पालकांनी शिकवणी आणि फीवर ₹50 लाख खर्च केले.साध्या कॉलेजच्या मुलाच्या पालकांना तर दुसऱ्या वर्षापर्यंत त्याला लॅपटॉप घेऊन देणेही परवडले नव्हते. पदवीनंतर हाती काय आलं? तर साध्या कॉलेजच्या मुलाला नोकरीची ऑफर मिळाली. आयआयटीच्या मुलाला 'आम्ही तुमचा अर्ज जपून ठेवू' (म्हणजे थोडक्यात नकार) असं उत्तर मिळालं. तुमचा जेईईमधील रँक किती होता किंवा तुम्ही कोणत्या कॉलेजमधून आला आहात, यात मला रस नाही. तुम्ही तुमच्या कामातून काय सिद्ध केलं आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणती गोष्ट बनवली, बिघडवली आणि दुरुस्त केली, याची मला काळजी आहे. कंपन्या तुम्हाला फक्त अल्गोरिदमची कोडी सोडवण्यासाठी पैसे देत नाहीत. ततुम्ही ज्या चांगल्या सिस्टीम उभ्या करू शकता (System building), त्यासाठी त्या पैसे देतात. असेही या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

सोशल मीडियावर चर्चा आणि वाद

आयआयटी पदवीधर आणि सर्वसामान्‍य कॉलेजमधील पदवीधराच्‍या तुलनेची लिंक्डइन पोस्टवरुन सोशल मीडियावर चांगलीच जोरदार चर्चा आणि वाद निर्माण झाला. या पोस्टमध्ये एका उमेदवाराला कमी लेखले गेले, तर दुसऱ्याची प्रशंसा करण्यात आली आहे, असे म्‍हणत अनेकांनी रिक्रूटरवर हेतूपुरस्सर वाद निर्माण करुन चर्चेच राहिल्‍याचा आरोप केला. तर मूल्यांकन प्रक्रियेवरच टीका करताना एका युजरने लिहिले की, नोकरीसाठी $1800$ 'LeetCode' प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरणे हे निरर्थक आहे. लोक आपली बरीच ऊर्जा केवळ या 'जुन्या' मूल्यमापन प्रक्रियेत वाया घालवतात. एका युजरने म्‍हलंट आहे की, आयआयटी ही देशातील सर्वोच्‍च शिक्षण संस्‍था आहे. येथील विद्यार्थ्याला कमी लेखण्याची गरज नव्हती, प्रतिभा तर सगळीकडे असते. पोस्ट करणाऱ्याने आपला दृष्टिकोन आणि पूर्वग्रह सुधारण्याची गरज असल्याचा सल्‍लाही त्‍याने दिला आहे.

पोस्‍ट 'आयआयटी'विरोधी नाही

आयआयटी पदवीधर आणि सर्वसामान्‍य कॉलेजमधील पदवीधराच्‍या तुलनेची लिंक्डइन पोस्टवरुन सोशल मीडियावर चांगलीच जोरदार चर्चा आणि वाद निर्माण झाल्‍यानंतर रिक्रूटरने स्‍पष्‍टीकरण दिलं की, " पोस्ट आयआयटी विरोधी नाही, तर ती एखाद्‍या विशिष्‍ट ठिकाणी शिकलं म्‍हणून सर्व काही येते या मानसिकतेविरोधी आहे."मी फक्त एका उमेदवाराचे मूल्यमापन केले, संस्थेचे नाही. जर टियर 3 पदवीधर अनुत्तीर्ण झाला असता आणि आयआयटीचा पदवीधर यशस्वी झाला असता, तर मी आयआयटीच्या पदवीधराला नोकरी दिली असती."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT