प्रातिनिधिक छायाचित्र. file photo
राष्ट्रीय

Tatkal Ticket Booking : दलालांना बसणार चाप! रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगमध्‍ये केला महत्त्वपूर्ण बदल

प्रायोगिक तत्वावर सुरू असणारी सुविधा लवकरच देशातील सर्व गाड्यांसाठी लागू होणार

पुढारी वृत्तसेवा

Train Ticket Booking New Rules:

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. आता रेल्वे तत्काळ तिकीटासाठी 'वन टाईम पासवर्ड' (OTP) प्रणाली लागू करण्यास येणार आहे. तत्काळ तिकीटांसाठी रेल्वेने १ओटीपी-आधारित प्रणालीचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला.येत्या काही दिवसांत ही सुविधा देशातील सर्व गाड्यांच्या तिकीट बुकिंगसाठी लागू केली जाईल. दलालांवर नियंत्रण मिळवणे, हा महत्त्‍वपूर्ण निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

नेमका काय बदल होणार?

भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट खिडकी (विंडो तिकीट बुकिंग) प्रणालीमध्ये 'वन टाईम पासवर्ड' (OTP) प्रणाली लागू करणार आहे. आता बुकिंगच्या वेळी प्रवाशाच्या मोबाईल फोनवर ओटीपी येईल. त्यानंतरच तिकीट बुकिंग पूर्ण होईल. पुढील काही दिवसांत देशभर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये ही नवी व्यवस्था कार्यान्वित होईल. रेल्वेच्या माहितीनुसार, तत्काळ काउंटर तिकीटांसाठी ओटीपी-आधारित प्रणाली लवकरच सर्व गाड्यांवर लागू होईल. तत्काळ सुविधेचा गैरवापर रोखणे आणि दलालांवर लगाम घालून प्रवाशांना सहजरित्या तिकीट मिळवून देणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

जुलै २०२५ मध्ये तत्काळ तिकीटासाठी बदल

प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी रेल्वेने 'ओटीपी-आधारित तत्काळ आरक्षण प्रणाली'चा प्रस्ताव ठेवला होता. सर्वात आधी जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तत्काळ तिकीटांसाठी 'आधार-आधारित प्रमाणीकरण' सुरू करण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये सर्वसाधारण आरक्षणाच्या पहिल्या दिवशीच्या बुकिंगसाठी 'ओटीपी-आधारित ऑनलाइन प्रणाली' लागू करण्यात आली. या दोन्ही प्रणाली प्रवाशांनी यशस्वीरित्या स्वीकारल्या असून, यामुळे आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुविधा वाढली असल्‍याचे रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे.

१७ नोव्हेंबरपासून प्रायोगिक रूपात सुरू

आरक्षण काउंटरवरून बुक होणाऱ्या तत्काळ तिकीटांसाठी रेल्वेने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी ओटीपी-आधारित प्रणालीचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला. सध्या ही व्यवस्था ५२ गाड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवासी जेव्हा आरक्षण फॉर्म भरून तत्काळ तिकीट बुक करतात, तेव्हा त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो. ओटीपीचे यशस्वीरित्या सत्यापन झाल्यावरच प्रवाशाचे तिकीट निश्चित केले जाते. येत्या काळात ही ओटीपी-आधारित तत्काळ आरक्षण प्रणाली उर्वरित सर्व गाड्यांवर लागू केली जाईल. रेल्वे तिकीटिंगमध्ये पारदर्शकता, प्रवासी सुविधा आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT