राष्ट्रीय

Tarique Rahman's swearing-in ceremony |तारिक रहमान यांच्‍या शपथविधी सोहळ्यास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार

१७ फेब्रुवारी रोजी ढाका येथे पार पाडणार सोहळा : पराराष्‍ट्र मंत्रालयाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Tarique Rahman's swearing-in ceremony

ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) अध्यक्ष तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या नवनियुक्त सरकारच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी ढाका येथे हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली.

लोकशाही मूल्यांचा सन्मान

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ओम बिर्ला यांचा महत्त्वाच्या सोहळ्यातील सहभाग भारत आणि बांगलादेशमधील जनतेमधील दृढ आणि चिरंतन मैत्री अधोरेखित करतो. दोन्ही देशांना जोडणाऱ्या लोकशाही मूल्यांबद्दल भारताची असलेली बांधिलकी यातून पुन्हा एकदा सिद्ध होते. इतिहास, संस्कृती आणि परस्पर आदराच्या भावनेने जोडलेले शेजारी देश म्हणून भारत, तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारचे स्वागत करत आहे.

भव्य शपथविधी सोहळा

बांगलादेशच्या संसदेच्या 'दक्षिण प्लाझा' येथे मंगळवारी दुपारी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या सोहळ्यासाठी भारत, चीन आणि पाकिस्तानसह १३ देशांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. राजनैतिक सूत्रांनुसार, निमंत्रितांच्या यादीत सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या देशांचाही समावेश आहे.

'सर्वांशी मैत्री'चे धोरण

बीएनपीचे नेते ए.एन.एम. एहसानुल हक मिलन यांनी शनिवारी आशा व्यक्त केली होती की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण दिले जाईल. "सर्वांशी मैत्री आणि कोणाशीही वैर नाही" हे पक्षाचे सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत 'बीएनपी'ला मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले होते. "हा विजय बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावर असलेला विश्वास दर्शवतो. लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेशक बांगलादेशला भारताचा पाठिंबा कायम राहील," अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधानांच्या या संदेशाबद्दल बीएनपीने 'X' वर पोस्ट करत आभार मानले आहेत. आगामी काळात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

बीएनपीने मिळवले निर्विवाद बहुमत

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेली बांगलादेशची सार्वत्रिक निवडणूक ही देशाच्या राजकारणातील एक ऐतिहासिक वळण ठरली आहे. २०२४ मध्ये झालेल्या जनआंदोलनानंतर शेख हसीना यांची सत्ता संपुष्टात आली होती. त्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीने ३०० पैकी १५१ पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले असून, 'जमात-ए-इस्लामी' युती मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT