नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाने आता चक्क तंदूरलाही लक्ष्य बनवले आहे. रोटी आणि भाजलेले पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोळसा आणि लाकडी इंधनावरील तंदूरवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खुले खाण्याचे स्टॉल्स यामध्ये तंदूरवर बंदीचे हे निर्देश दिले आहेत.
दिल्लीतील प्रदूषण पातळी दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता दिल्लीतील आनंद विहार आणि आरटीओ येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुमारे 400 च्या आसपास नोंदवला गेला, जो अतिगंभीर श्रेणीत येतो. राजधानीतील अनेक विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम होताना दिसून येतआहे. अनेक उड्डाणे विलंबाने होत आहेत, त्याचा मनस्ताप प्रवाशांना होत आहे. काही उड्डाणे रद्ददेखील करण्यात आली आहेत. दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने, गेल्या शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू करण्यात आला. यानुसार, बायोमास, कचरा किंवा कोळसा जाळणे यांसारखे कोणतेही खुले ज्वलन पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सर्व रेस्टॉरंट्स आणि खाण्याचे स्टॉल्स यांना तातडीने इलेक्ट्रिक, गॅसआधारित किंवा इतर स्वच्छ इंधनाच्या उपकरणांकडे वळण्यास सांगण्यात आले आहे.
शहरातील सर्व उपाहारगृहे कोळसा आणि लाकडी इंधनाचा वापर तातडीने थांबवतील, हे सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांना आणि मुख्य अभियंत्यांना तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.