शिवगंगा : तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात तिरुप्पत्तूर-कारैकुडी मुख्य मार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दोन सरकारी बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक बस तिरुप्पूरमधील कांगेयम येथून कारैकुडीकडे जात होती आणि दुसरी बस शिवगंगातील कारैकुडीहून दिंडीगुलकडे जात होती. संध्याकाळी 5 च्या सुमारास या दोन्ही बसची धडक झाली. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा तिरुप्पत्तूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. सर्व जखमींना कारैकुडी, तिरुप्पत्तूर शासकीय रुग्णालये आणि शिवगंगा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नचियापुरम पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एस. पी. शिवा प्रसाद यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, नचियापुरम पोलिसांनी या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.