Tamil Nadu Election Vijay: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेता आणि राजकारणात पदार्पण केलेल्या विजय यांच्या पक्षाबाबत पसरलेल्या अफवेमुळे एका चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय महेंद्रन नावाच्या युवकाने विजय यांच्या पक्ष तमिळगा वेट्री कझगम (TVK) या निवडणुकीत पराभूत होईल, अशी अफवा ऐकून टोकाचे पाऊल उचलले. मतमोजणीपूर्वीच त्याने घराबाहेर उभे राहून गळा चाकूने कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. आसपासच्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, संबंधित परिसरात TVK पराभूत होणार असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या. या अफवांमुळे महेंद्रन मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ झाला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये मात्र चित्र पूर्णपणे वेगळे दिसत आहे. TVK पक्षाला मोठी आघाडी मिळताना दिसत असून सत्तांतराची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही कलांनुसार TVK 112 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर प्रमुख आघाड्या मागे पडताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर विजय यांचा पक्ष राज्यात मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. मात्र या घटनेमुळे चाहत्यांमध्ये भावना किती टोकाला जाऊ शकतात, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, अफवांवर विश्वास ठेवून अशा टोकाच्या कृती करणे धोकादायक असून समाजाने आणि विशेषतः तरुणांनी संयम बाळगणे आवश्यक आहे.