राष्ट्रीय

Tamil Nadu Election Results 2026 | एका सिनेमावरुन थेट जयललितांशी पंगा; 'थलाइवा'च्या संघर्षाने तमिळनाडूचं राजकारण कसं बदललं?

Tamil Nadu Election Results 2026 | तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांची ऐतिहासिक झेप

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu Election Results 2026 Thalapathy Vijay's TVK Leads

दाक्षिणात्य चित्रपटातला नायक म्हणजे 'वन मॅन आर्मी'! तो सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असतो. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. पडद्यावरचं हे अचाट धाडस पाहणं जेवढं रंजक असतं, तेवढंच वास्तववादी राजकारण कठीण असतं; पण याला अपवाद आहे ते म्हणजे तामिळनाडू! गेल्या ५० वर्षांपासून या राज्यात 'सिनेमा' आणि 'राजकारण' एकाच नाण्याच्या दोन बाजू राहिल्या आहेत. चित्रपट ताऱ्यांच्या ग्लॅमरचा वापर करून 'द्रमुक' आणि 'अण्णाद्रमुक' सारख्या प्रादेशिक पक्षांनी इथे दशकानुदशके राज्य केलं. आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. तमिळ सिनेसृष्टीचा सुपरस्टार 'थलपती' विजय याने आता राजकीय मैदानात शड्डू ठोकला आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासाची ठिणगी एका जुन्या संघर्षातून पडली होती—जो संघर्ष थेट तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी झाला होता. जाणून घेऊया अभिनेते विजय यांचे राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत देणाऱ्या या संघर्षाविषयी...

'थलाइवा' चित्रपटावरून तत्कालीन मुख्यमंत्री जयललितांबरोबर वाद

वर्ष होते २०१३. अभिनेता विजय आणि तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यात 'थलाइवा' (Thalaivaa) चित्रपटाच्या प्रदर्शनावरून मोठा राजकीय वाद झाला होता.

वादाचे कारण काय होते?

२०१३ मध्ये जेव्हा विजयचा 'थलाइवा' चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा त्याला तामिळनाडूतील तत्कालीन अण्णाद्रमक (AIADMK) सरकारकडून प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. या चित्रपटाची टॅगलाईन 'Time to Lead' अशी होती. ही टॅगलाईन राजकीय अर्थाने सूचक असल्याचे मानले गेले. यातूनच जयललिता सरकारने नाराजी व्यक्त केली होती. तमिळनाडूमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही थिएटर्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. सुरक्षिततेचे कारण देऊन सरकारने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले होते.

कर सवलतबरोबरच मुख्यमंत्री जयललितांनी भेटही नाकारली!

अण्णाद्रमक सरकारने तमिळ नाव असलेल्या चित्रपटांना कर सवलत देत असे. मात्र 'थलाइवा'ला ती नाकारण्यात आली होती. चित्रपट प्रदर्शनास वेळ होत असल्याने विजय यांनी जयललिता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांना भेटीची वेळ मिळाली नाही. अखेर विजयने एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

'Time to Lead' ही टॅगलाईन हटवावी लागली

अखेर जयललिता यांच्या नाराजीनंतर विजय यांनी आपल्या चित्रपटाची 'Time to Lead' ही टॅगलाईन हटवली. तसेच चित्रपटात काही बदलही केले. यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनास संमती मिळाली होती.

निमित्त चित्रपटाचं, वाद 'राजकीय'

तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता आणि विजय यांच्यातील वाद हा केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे काही राजकीय कारणेही होती. विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी विजय यांच्या राजकीय प्रवेशाबाबत सूचक विधान केले होते. यानंतर जयललिता सरकार सावध झाले होते. कारण विजय लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. तसेच 'थलाइवा' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०११ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयने जयललिता यांच्या आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर काही काळातच त्यांच्यातील संबंध ताणले गेले.

२०१८ मध्ये पुन्हा 'सरकार' चित्रपटाचा वाद

जयललिता यांच्या निधनानंतरही विजयच्या 'सरकार' चित्रपटावरून अण्णाद्रमक पक्षाने आक्षेप घेतला होता. या चित्रपटात जयललिता यांच्या काही योजनांवर (उदा. मोफत मिक्सर-ग्राइंडर वाटप) टीका केल्याचा आरोप पक्षाने केला होता. विजयची वाढती लोकप्रियता आणि त्याच्या चित्रपटांमधील राजकीय संवाद यामुळे जयललिता यांच्या काळात त्यांच्यात अनेकदा वैचारिक आणि राजकीय मतभेद दिसून आले होते.

चित्रपटांना संन्यास ते निवडणुकीत आघाडी

विजय यांनी २ फेब्रुवारी २०२४ रोजी 'तमिळगा वेत्री कळघम' (Tamizhaga Vettri Kazhagam - TVK) पक्षाची अधिकृत घोषणा केली. त्याआधी अनेक वर्षे ते त्यांच्या 'विजय मक्कल इयक्कम' (VMI) या फॅन क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होते. २०२१ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या फॅन क्लबच्या काही उमेदवारांनी विजय मिळवला होता, त्यांच्या राजकीय प्रवासाची ही नांदी मानली गेली. यानंतर विजय यांनी राजकीय पक्षाची घोषणा करतानाच चित्रपटसृष्टीतून संन्यास घेणार असल्याचे जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. राजकारण ही त्यांच्यासाठी केवळ 'वेळ घालवण्याचे साधन' (hobby) नसून ती एक 'जनसेवा' आहे. त्यांचा ६९ वा चित्रपट (Thalapathy 69) हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट मानला गेला. आज विजय हे तामिळनाडूच्या राजकारणातील नायक म्हणून उदयास आले असून तामिळनाडूच्या राजकारणातील 'फिल्मी' वर्तुळ पूर्ण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT