Tamil Nadu CM Vijay Amma Canteen Revamp
चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी आज (दि. १८) राज्यातील 'अम्मा कॅन्टीन' च्या नूतनीकरणाचे देश दिले. २०११-१६ दरम्यानच्या अण्णा द्रमुक (AIADMK) सरकारच्या काळात या कॅन्टीनची सुरुवात करण्यात आली होती.
तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त२४ फेब्रुवारी २०१३ रोजी या कॅन्टीनची सुरुवात झाली होती. त्यांचे समर्थक आणि पक्षाचे कार्यकर्ते त्यांना प्रेमाने "अम्मा" म्हणून हाक मारायचे. सुरुवातीला चेन्नईमध्ये सुरू झालेल्या या कॅन्टीनचा विस्तार नंतर इतर शहरे आणि गावांमध्ये करण्यात आला. जनतेला अत्यंत कमी दरात अन्न देणाऱ्या या कॅन्टीन योजनेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
२०२१ मध्ये, अण्णा द्रमुकचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला द्रमुक (DMK) पक्ष सत्तेवर आला. त्यांनी ही योजना सुरु ठेवली. निमशहरी भागांत आणखी २०० नवीन कॅन्टीन सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, त्यांनी या योजनेचे नावही बदलले नाही.
मुख्यमंत्री विजय यांनीही हीच परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. त्यांनी अम्मा कॅन्टीनची पायाभूत सुविधा सुधारण्याचे आणि लोकांना चवदार व दर्जेदार अन्न मिळण्याची खात्री करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अम्मा कॅन्टीनमधील जेवणाचा दर्जा आणि चव समाधानकारक नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेतली. एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, मुख्यमंत्र्यांनी कॅन्टीनमधील सुविधा आणि पायाभूत संरचनेत सुधारणा करण्याचे, तसेच स्वयंपाकाची नवीन भांडी व उपकरणे खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून जनतेला दर्जेदार आणि चवदार भोजन मिळेल.सध्या ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन अंतर्गत ३८३ आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखरेखीखाली २३७ अम्मा कॅन्टीन कार्यरत आहेत.