नवी दिल्ली : आग्रा येथील भारताचे गौरवशाली पांढरे संगमरवरी स्मारक ‘ताजमहाल’ पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या स्मारकांपैकी एक ठरले आहे. पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2024-25 या वर्षात 69 लाख पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली, ज्यात एकूण 6 लाख विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.
मुघलकालीन सम्राट शाहजहाँ आणि त्याची पत्नी मुमताज महल यांच्या 17 व्या शतकातील या समाधीने मागील दशकापासून सर्वाधिक महसूल आणि सर्वाधिक पर्यटकसंख्या राखली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संरक्षित 145 तिकीट असलेल्या स्मारकांच्या एकूण पर्यटक नोंदींमध्ये ताजमहालचा वाटा जवळपास 12 टक्के आहे.
देशांतर्गत पर्यटकांसाठी कोणार्क, तर विदेशींसाठी आग्रा फोर्ट आणि कुतुब मिनार पर्यटन मंत्रालयाच्या ‘इंडिया टूरिझम डेटा कॉम्पेंडियम’नुसार, देशांतर्गत पर्यटकांसाठी कोणार्क येथील सूर्य मंदिर (35.7 लाख) आणि दिल्लीतील कुतुब मिनार (32 लाख) ही इतर लोकप्रिय स्थळे आहेत. विदेशी पर्यटकांच्या पसंतीत आग्रा फोर्ट (2.24 लाख) दुसर्या क्रमांकावर असून, त्यानंतर कुतुब मिनार (2.20 लाख) आहे.
देशांतर्गत पर्यटकांनी भेट दिलेल्या इतर प्रमुख स्मारकांमध्ये दिल्लीतील लाल किल्ला (28.84 लाख), महाराष्ट्रातील छ. संभाजीनगर येथील बीबी का मकबरा (20.04 लाख) आणि वेरूळ लेणी (17.39 लाख) यांचा समावेश आहे. विदेशी पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या स्थळांमध्ये दिल्लीतील हुमायूनचा मकबरा आणि फतेहपूर सिक्री यांचा समावेश आहे.
पुरातत्त्व विभाग संरक्षित स्थळांवर एकूण 5.66 कोटी पर्यटकांनी भेट दिली, ज्यात 24.15 लाख विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटकांची ही आकडेवारी पुरातत्त्व विभागाच्या तिकीट विक्रीच्या नोंदींवर आधारित असते.
ठळक मुद्दे
ताजमहालला 2024-25 मध्ये 69 लाख पर्यटकांची भेट
एकूण पर्यटकांपैकी 6 लाख पर्यटक विदेशी होते
देशांतर्गत पर्यटकांमध्ये कोणार्क सूर्य मंदिर (35.7 लाख) दुसर्या क्रमांकावर आहे
पुरातत्त्वचे तिकीट असलेल्या स्मारकांच्या एकूण पर्यटनात ताजमहालचा वाटा 12 टक्के आहे