राष्ट्रीय

राज्यातील ३ विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’; केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना २०२१-२२ च्या 'स्वच्छ विद्यालय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकतेच 'स्वच्छ विद्यालय पुरस्कारां'चे वितरण करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ.राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्ल‍िक स्कूल या विद्यालयांना 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संबंधित शाळेंचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्याध्यापकांसह उपस्थित होते.

या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले होते. पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोरोना काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष २०१६-१७ पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. वर्ष २०२१-२०२२ च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण ३९ शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये ३४ विद्यालयांची निवड तर उपश्रेणींमध्ये ५ विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत १७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे.

निवड झालेल्या विद्यालयांमध्ये २१ शाळा ग्रामीण भागातील तर १८ शाळा शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये २८ शाळा अनुदान‍ित, ११ शाळा खाजगी, २ कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, १ नवोदय विद्यालय आणि ३ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. सर्व समावेशक श्रेणीमधील ३४ विद्यालयांना ६० हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील ५ विद्यालयांना २० हजार रूपये रोख तसेच प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT