मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनजणांकडून मारणार असल्याच्या आशयाचा व्हॉट्सअॅप संदेश, ऑडिओ क्लिप आणि काही फोटो मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती देणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले असून, वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या वरळी येथील ट्राफिक हेल्पलाईनच्या ८४५४९९९९९९ या व्हॉट्सॲप नंबरवर एका मोबाईल धारकाने रविवारी पंतप्रधान यांना मारणार आहेत, असे संदिग्ध सात ऑडिओ क्लिप पाठविल्या. तसेच, सुप्रभात बेज नावाच्या आधार कार्डचा फोटो, नवाज अकू कबर नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर असलेले बिस्मा डायमंडचे व्हिजिटिंग कार्ड, केरळा पोलिसांचा कोव्हिड २०१९ चा फोटोपास, असे फोटोग्राफ असल्याचे सांगून सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅप चॅटमध्ये १२ ऑडिओ क्लिप, तीन फोटो, कंपनीतली फ्रेंड सर्कलचे फोटो, तसेच चार व्हॉट्सअॅपचे टाईप केलेले मेसेज असा मजकूर पाठवला आहे.
पोलिसांनी या माहितीचे अवलोकन केले असता, चॅट करणारा व्यक्ती हा पोलिसांना दाउद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद आणि नवाज हे असून ते प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारणार आहेत. तसेच, देशाची बरबादी करणार आहेत. त्यांनी माझा पगार दिला नसून मला वेडे बनविले आहे असे हिंदीमधील संभाषण असल्याचे उघड झाले. अखेर पोलिसांनी बिस्मा डायमंड कंपनीचे मॅनेजर नवाज अबू बकर यांना संपर्क साधून चॅट करणाऱ्या आधार कार्डवर नाव असणाऱ्या सुप्रभात बेज नावाच्या व्यक्तीला ओळखत आहात का, अशी विचारणा केली.
त्यावेळी हा व्यक्ती दोन वर्षांपूर्वी त्यांच्या कालिकत, केरळ येथील बिस्मा डायमंड कंपनीमध्ये सोन्याचे दागिने अनविण्याचे काम करत होता. मात्र गेल्या एका वर्षापासून त्याला वेगवेगळे भास होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. भूत आले आहे. कुणीतरी आपल्याला मारतोय, असे भास त्याला वारंवार व्हायचे. या मानसिक आजारामुळे त्यांनी त्याला कामावरून काढून टाकले असल्याचे सांगितले. तो मनोरुग्ण असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी धमकीच्या आलेल्या संदेशांबाबत सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हेही वाचा :