Sushilkumar Shinde (Pudhari File Photo)
राष्ट्रीय

Malegaon Blast Verdict | ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरायला नको होता

Shinde Podcast Viral | सुशीलकुमार शिंदेंच्या कबुलीचा व्हिडीओ व्हायरल; मालेगाव स्फोट निकालानंतर जुना पॉडकास्ट चर्चेत, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ‘भगवा दहशतवाद’ या शब्दावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द वापरायला नको होता, अशी स्पष्ट कबुली दिली आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका यूट्यूबरला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत शिंदे यांनी हे वक्तव्य केले होते. ते म्हणतात, भगवा दहशतवादावर मी तेच बोललो जे त्यावेळी रेकॉर्डवर आले होते. मी पक्षाच्या बैठकीत सांगितले होते, जाहीरपणे नाही. पण त्यावेळी जे विचारले ते मी सांगितले. मी तो शब्द का वापरला, माहीत नाही. पण तो वापरायला नको होता. भगवा, लाल, पांढरा हे पक्षांचे विचार असतात, दहशतवाद नाही. त्यांच्या या कबुलीमुळे काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत आली आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण 2013 सालचे आहे. जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक खळबळजनक विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, देशात ‘भगवा दहशतवाद’ अस्तित्वात असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरआरएस) आणि भाजपच्या प्रशिक्षण शिबिरांमधून त्याला खतपाणी घातले जात आहे. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी समझौता एक्स्प्रेस आणि मालेगाव बॉम्बस्फोटांचाही उल्लेख केला होता.

शिंदे यांच्या या विधानानंतर देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपने यावर जोरदार आक्षेप घेत काँग्रेसवर देशाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला होता. या विधानामुळे काँग्रेस पक्ष मोठ्या राजकीय संकटात सापडला होता.

वादानंतर मागितली होती माफी

वाढता वाद आणि भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर शिंदे यांना आपले विधान मागे घ्यावे लागले होते. त्यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले होते की, दहशतवादाला कोणत्याही धर्माशी जोडण्याचा त्यांचा हेतू नव्हता. तसेच, जयपूरमधील भाषणात उल्लेख केलेल्या संघटनांचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी नंतर म्हटले होते.

आता मालेगाव स्फोट प्रकरणाच्या निकालानंतर शिंदे यांच्या या कबुलीनाम्यामुळे ‘भगवा दहशतवाद’ या मुद्द्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपने या व्हिडीओच्या आधारे काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली असून काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी हिंदूंना बदनाम केल्याचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT