

सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन तयारीला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी (दि. 2) काँग्रेस भवन येथे पार पडली. त्यावेळी शिंदे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलका राठोड, सुशीला आबुटे, प्रमिला तुपलवंडे, अशोक निंबर्गी, गणेश डोंगरे, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, फिरदौस पटेल, सुदीप चाकोते, देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, सुशील बंदपट्टे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सोलापूरसाठी अनेक विकासकामे केली आहेत मागील दहा वर्षातील भाजप आणि काँग्रेसची कामाची तुलना करून लोकांना समजावून सांगा. उमेदवार कोणीही असो त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी रेल्वे सल्लागार समितीच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल गणेश डोंगरे यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा, बलिदान दिले आहे. काँग्रेस पक्ष एक विचार आहे. तो कोणीही संपवू शकणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. उजनीत पाणी असूनही सोलापूरकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनतेच्या हितासाठी निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केले.