नवी दिल्ली : महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली. यासह अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याला विशेष पॅकेज देण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
बुधवारी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीची सविस्तर माहिती कृषीमंत्र्यांना दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात झालेले नुकसान खूप मोठे आहे. राज्यातील परिस्थितीसंदर्भात शिवराज सिंह चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहेत. दरम्यान, मी अमित शाह यांनाही वेळ मागितला होता मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र स्वतः शिवराज सिंह चव्हाण महाराष्ट्रातील परिस्थितीसंदर्भात अमित शाह यांच्याशी बोलणार आहेत. यापूर्वी जून महिन्यातही मी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही राजकारण करण्याची वेळ नाही. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने मदतीचा हात मोकळा सोडावा. राज्य सरकारने जाहीर केलेली दोन हजार कोटी रुपयांची मदत राज्यातील नुकसान पाहता अतिशय कमी आहे. त्यामुळे सरकारने फायलींच्या कचाट्यात न अडकता सरसकट मदत द्यावी, असेही त्या म्हणाल्या.