

कराड ः लाडकी बहीण योजनेत 4 हजार 900 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे शासनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ते पैसे महिलांनी काढले नाहीत, पुरूरुषांनी काढले असे सरकार म्हणत आहे. मात्र कोणी काढले? पुढे काय झाले? असे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतून 26 लाख महिलांना वगळण्यात आल्याचा दावा सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार श्रीनिवास पाटील, सौरभ पाटील, सारंग पाटील, नंदकुमार बटाणे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लाडकी बहिण योजनेसाठी सध्या राज्य सरकार निकष लावत आहे, ती वेळ का आली, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी थेट त्या योजनेवर त्यांनी टिका केली. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या महिलांची नावे वगळली आहेत. त्यांना यापूर्वी त्या योजनेत समाविष्ठ करून कसे घेतले ? त्यावेळी कोणते निकष लावले होते ? आत्ता कोणत्या निकषांसह अधिकाराने तुम्ही योजनेचा लाक्ष घेण्यास त्यांना मनाई करत आहात? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणे सरकारला बंधनकारक आहे. मात्र सरकारचे पैसे असूनही सरकार उत्तर देत नाही, हेच दुर्देवी आहे.
राज्य सरकार असंवेदनशील असून सध्याची सामाजिक, राजकीय व आर्थिक स्थिती अस्थिर आहे. अशा काळात विरोधक म्हणून कणखर भूमिका नेहमीच राहणार आहे. राज्य शांत राहिले पाहिजे, यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आरक्षणाचा प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मागणी आहे. शेतकर्यांसह ठेकेदार, शिक्षकांवर आत्महत्येची वेळ सरकारच्या असंवेदनशीलतेमुळेच आली असल्याचा दावा करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार स्वतंत्रपणे लढविल्या जातील, असे संकेत दिले आहेत.