Supreme Court on fake rape cases
नवी दिल्ली : परस्पर संमतीने सुरू झालेलं प्रेमसंबंध बिघडलं म्हणून त्या आधारे बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने एका 23 वर्षीय तरुणाविरोधात दाखल बलात्काराची केस फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि सत्य चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
फिर्यादी ही एक घटस्फोटित महिला असून तिचा चार वर्षांचा मुलगा आहे. ती 2001 पासून आई-वडिलांसोबत राहत होती. तिचा आरोप आहे की 2022 मध्ये एका पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाशी तिची ओळख झाली.
जुलै 2022 मध्ये त्याने तिला लग्नाचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवले आणि पुढे अनेक वेळा त्याच कारणावरून शरीरसंबंध ठेवले.
पण नंतर त्या तरुणाने संवाद कमी केला. म्हणून ती त्याच्या घरी गेली असता, त्याच्या पालकांनी धर्मभिन्नतेचा मुद्दा पुढे करत लग्न शक्य नसल्याचं सांगितलं.
त्यानंतर तिने संबंधित तरुणाविरुद्ध कलम 376 (बलात्कार), 372 (2)(एन) (पुनरावृत्तीने बलात्कार), 377 (प्रकृतीविरुद्ध लैंगिक कृत्य), 504 (अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत एफआयआर दाखल केला.
या तरुणाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता जो मंजूर झाला. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात खटला रद्द करण्याची मागणी केली, मात्र उच्च न्यायालयाने ती नाकारली. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, “संमतीने सुरू झालेलं नातं बिघडल्यावर त्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणं योग्य नाही. फसवणूक झाल्याचं केवळ म्हणणं पुरेसं नाही.
या प्रकरणात फिर्यादीने स्वतः कबूल केलं आहे की ती आणि आरोपीमध्ये प्रेमसंबंध होते आणि ते वर्षभर सुरू होते. दोघे लॉजमध्येही भेटले होते. त्यामुळे शारीरिक संबंध हे एका आश्वासनावरून जबरदस्तीने झाले, असं मानता येत नाही.”
न्यायालयाने स्पष्ट केलं की फिर्यादीच्या वर्तनातून तिच्या आरोपांना पाठबळ मिळत नाही. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती, धमकी, शारीरिक इजा याचा पुरावा नसल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.
सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांना आणि तपास यंत्रणांना अशा प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
“प्रेमसंबंधातून नातं तुटल्यावर लगेच बलात्काराचा आरोप लावणं ही कायद्याचा गैरवापर करणारी प्रवृत्ती आहे. प्रत्येक ‘लग्नाचं वचन’ हे खोटं असल्याचं समजून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा लावणं ही चुकीची आणि घातक गोष्ट आहे.”
दरम्यान, ज्या प्रकरणात संमतीने संबंध सुरू झाले, मात्र नंतर तणावामुळे किंवा सामाजिक अडथळ्यांमुळे संबंध तुटले. अशा अनेक प्रकरणांवर या निकालानंतर परिणाम होण्याची शक्यता आहे.