Supreme Court On Teacher: विद्यार्थ्याच्या आत्महत्येशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या वर्तनाबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. विद्यार्थ्यांना वर्गात सर्वांसमोर अपमानित करणे योग्य नसून, अशा वागणुकीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हे प्रकरण एका प्राध्यापकाने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. सुनावणीदरम्यान प्राध्यापकांच्या वतीने ज्येष्ठ वकील डी. एस. नायडू यांनी युक्तिवाद केला की, विद्यार्थ्याचा कथित अपमान हा आत्महत्येच्या जवळपास महिनाभर आधी झाला होता. त्यामुळे त्या घटनेला आत्महत्येचे थेट कारण मानता येणार नाही.
वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, विद्यार्थ्याच्या मृत्यूपूर्वी सुमारे एक तास आधी घडलेली दुसरी घटना अधिक महत्त्वाची होती. विद्यार्थ्याने एका मोबाईल अॅपद्वारे कर्ज घेतले होते आणि परवानगी न घेता एका प्राध्यापकाचे नाव हमीदार म्हणून दिले होते. त्यानंतर कर्ज वसुली करणाऱ्या एजंटांकडून त्याला सतत त्रास दिला जात होता. त्यामुळे मानसिक तणाव वाढल्याचा दावा त्यांनी केला.
याचवेळी वकिलांनी असेही सांगितले की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही वेळा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. अशा प्रत्येक घटनेत फौजदारी कारवाई झाल्यास शिस्त राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
मात्र, न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी या युक्तिवादावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ते म्हणाले, "काळ बदलला आहे. आमच्या काळात शिक्षकांकडून मार किंवा कठोर वागणूक सामान्य मानली जात होती. पण आता परिस्थिती बदलली आहे."
न्यायमूर्ती मेहता यांनी पुढे सांगितले की, एखाद्या विद्यार्थ्याचा वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान केल्यास त्याचा मानसिकतेवर खोल परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचा स्पष्ट मेसेज समाजात जाणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सन्मानाने आणि संवेदनशीलतेने वागणे ही काळाची गरज असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत, शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि विद्यार्थ्यांचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.