Sanjay Raut Supreme Court Case Pudhari
राष्ट्रीय

Supreme Court: संजय राऊतांना 'ते' वक्तव्य भोवलं! १७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?

Sanjay Raut Supreme Court Case: पत्रकार निखिल वागळे यांनाही पुढील सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले असून, त्यांना ऑनलाइन हजेरीची परवानगी देण्यात आली आहे.

Rahul Shelke

Sanjay Raut Supreme Court Case: सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबाबत सोशल मीडियावर त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. आता त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू आहे. या प्रकरणात पत्रकार निखिल वागळे यांनाही न्यायालयाने उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, वागळे यांना पुढील सुनावणीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणाचा संबंध केवळ संबंधित व्यक्तींशी नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेशी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

भारतीय सर्वोच्च न्यायालयाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या विधानांमुळे न्यायालयाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने (SCBA) या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी भारताच्या अॅटर्नी जनरल यांनी लेखी संमती दिली होती.

निखिल वागळेंनी मागितली बिनशर्त माफी

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिल्यानंतर निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागितली आणि संबंधित पोस्ट हटवली. मात्र, पोस्ट हटवण्यासाठी पाच दिवसांचा विलंब झाल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

वागळे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली. वागळे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केलेले नाही आणि त्यांना आपल्या विधानाचा पश्चात्ताप आहे, असे त्यांनी सांगितले. वागळे मुंबईत राहत असल्याने त्यांना ऑनलाइन उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. गरज पडल्यास भविष्यात त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले जाऊ शकते.

संजय राऊतांना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार

सुनावणीदरम्यान संजय राऊत यांच्या बाजूने कोणताही वकील उपस्थित नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले.

राऊत यांनी न्यायाधीश राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि मुख्यमंत्र्यांकडून आयोजित मेजवान्यांना जातात, असे आरोप केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्यायाधीशांबाबत लंडनमधील बॅडमिंटन खेळाच्या कथित फोटोंचा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भातील काही दावे खोटे असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटल्याचा उल्लेखही याचिकेत आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या सुनावणीत संजय राऊत आणि निखिल वागळे यांच्या भूमिकेबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT