Supreme court rape case marriage  Pudhari
राष्ट्रीय

Supreme Court Marriage: फेसबुकवरील प्रेमाचा वाद; सुप्रीम कोर्टात लग्नाची गाठ! न्यायाधीश बनले साक्षीदार; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट...

Supreme Court Marriage: बलात्कारप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा ते ‘सात फेऱ्यां’पर्यंतचा प्रवास; कोर्टाने मागवलेली फुले दिली एकमेकांना

Akshay Nirmale

Supreme court rape case marriage

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये सामान्यतः देशातील मोठ्या समस्या, गंभीर आणि जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी होते आणि सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणांमध्ये दीर्घ सुनावणीनंतर निकाल देते. मात्र, गुरुवारी 15 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टात यापेक्षा वेगळं दृश्य पाहायला मिळालं. हे प्रकरणच नेहमीच्या सुनावणींपेक्षा पूर्णपणे भिन्न होतं.

फेसबुकवरील प्रेमापासून सुरू झालेला एका तरूण युगुलाचा प्रवास सुप्रीम कोर्टात बलात्काराच्या शिक्षेपासून लग्नाच्या बेडीपर्यंत येऊन पोहचला. यात सुप्रीम कोर्टाने या युगुलाचे लग्न लाऊन दिले. कोर्टानेच फुले मागवली अन दोघांनी एकमेकांना फुलांचा नजराणा देत नवीन सुरवात केली. कोर्टातील न्यायाधीश या लग्नाचे साक्षीदार ठरले.

तरूणाला सुनावली होती 10 वर्षांची शिक्षा

या घटनेतील तरुण आणि तरुणी जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. फेसबूकवरून त्यांची मैत्री झाली होती. त्यातून दोघांत प्रेम निर्माण झाले आणि ते एकमेकांच्या खूप जवळही आले. पण नंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला होता.

तरुणीचा आरोप होता की तरुणाने तिला लग्नाचं वचन दिलं होतं, पण नंतर तो त्या वचनावरून मागे हटला.

तिने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आणि या प्रकरणात तो दोषी आढळून आला. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने ऐकून घेतलं आणि निर्णय दिला.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकलं आणि आदेश दिला. न्यायालयाने तरुण आणि तरुणीला त्यांच्या पालकांसह आणि वकिलांसह चेंबरमध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं. दुपारच्या जेवणाआधी हे सर्व जण चेंबरमध्ये गेले आणि न्यायमूर्तींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.

दोघेही लग्नासाठी इच्छूक

न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं की, दोघांना संवाद साधण्यासाठी वेळ देण्यात आला होता. जेणेकरून ते न्यायालयाला सांगू शकतील की ते साखरपुडा आणि लग्न करू इच्छितात का? जेवणानंतर पुन्हा त्यांना कोर्टात बोलावण्यात आलं. त्यावेळी दोघांनीही सांगितलं की ते लग्न करण्यास इच्छुक आहेत.

पालक लवकरच त्यांचा विवाह लाऊन देतील

न्यायालयाने आशा व्यक्त केली की दोघांचा विवाह लवकरच पार पडेल आणि त्यांच्या पालकांकडून त्याची तयारी होईल. तसेच, न्यायालयाने सांगितलं की, तरुणाला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात येईल आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, जे त्याला योग्य अटींवर जामिनावर सोडू शकेल.

सुप्रीम कोर्टानेच फुलांचं आयोजन केलं...

या प्रकरणात तरुणाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्याने आपल्याला झालेली शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.

मात्र, जबलपूर खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

सुनावणीदरम्यान एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खंडपीठाने या जोडप्याला एकमेकांना फुलं देण्यास तयार केलं. मध्य प्रदेश सरकारकडून न्यायालयात उपस्थित असलेले वकील मृणाल गोपाल एकर यांनी सांगितलं की, फुलांचं आयोजनही कोर्टानेच केलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT