NEET PG 2025
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.३०) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजे नीट-पीजी परीक्षा २०२५ (NEET-PG 2025) बाबत महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला (NBE) ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एनबीईचा नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय फेटाळून लावला. कारण अशापद्धतीच्या परीक्षेमुळे मनमानी होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या एनबीईच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांवरील सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
पारदर्शकता राहण्यासाठी एकाच शिफ्टमध्ये नीट-पीजी परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायालयाने एनबीईला दिले आहेत. ही परीक्षा १५ जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी अजूनही वेळ असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
"दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्यास मनमानी होईल आणि यामुळे सर्व उमेदवारांना एकाच पातळीवर ठेवता येणार नाही. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका कधीही एकाच पातळीवर अवघड अथवा सोप्या असल्याचे म्हणता येणार नाही. त्यात फरक असला पाहिजे", असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचा एनबीईचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. "ही परीक्षा केवळ एका शहरात नाही तर संपूर्ण देशरात घेतली जात आहे. देशातील तांत्रिक प्रगती पाहता, परीक्षा मंडळाला एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासाठी पुरेशी केंद्रे सापडली नाहीत, ही पटणारी गोष्ट नाही." असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी निर्देश जारी केले होते. प्रवेशासाठी समुपदेशन करण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रवेश शुल्क जाहीर करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. जागा रोखून ठेवण्याच्या गैरप्रकारांना तोंड देण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला होता.