Madhuri Elephant
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील 'वनतारा'मध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चंदुकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही याचिका सुचीबद्ध करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.
हे प्रकरण लवकर सुचीबद्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. माधुरी हत्तीणीला मठातून 'वनतारा'मध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
नांदणी मठातून ‘माधुरी हत्तीणी’ला २८ जुलै रोजी जामनगर येथील 'वनतारा'च्या राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवण्यात आले होते. ‘माधुरी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले. जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला १,२०० वर्षांची परंपरा असून या मठाकडे ४०० वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्यानुसार नांदणी येथील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारामध्ये पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याविरोधात नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती.