पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे गुरुवारी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेज येथे भाषण झाले. त्यांचे भाषण सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी अचानक घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
यावेळी ममतांनीही, दिदी (ममता) कुणालाही घाबरत नाही, मी रॉयल बेंगॉल टायगर आहे, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना दम दिला. दरम्यान, यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे देखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते.
ममता बॅनर्जी यांनी लंडन दौऱ्यात उद्योग आणि व्यापाराशी संबंधित महत्त्वाच्या बैठका घेतल्या. ऑक्सफर्डमधील केलॉग कॉलेज येथे ममतांना महिला, मुले आणि समाजातील दुर्बल गटांच्या सामाजिक विकासावर भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते.
आपल्या भाषणात त्यांनी 'स्वास्थ्य साथी' आणि 'कन्याश्री' यांसारख्या त्यांच्या सरकारच्या प्रमुख योजनांचा उल्लेख केला. ममता पश्चिम बंगालमधील औद्योगीकरणावर बोलत असताना, टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीतील गुंतवणुकीचा विषय समोर आला.
त्याचवेळी, काही विद्यार्थ्यांनी 'निवडणूकीनंतरचा हिंसाचार' आणि 'आर. जी. कर कॉलेज'मधील बलात्कार प्रकरणांचे पोस्टर्स हातात धरून घोषणाबाजी सुरू केली.
मात्र, मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, "तुम्ही माझे स्वागत करत आहात, धन्यवाद! मी तुम्हाला मिठाई खाऊ घालीन. आर. जी. कर कॉलेज प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारकडे आहे. हा विषय आमच्या हातात नाही.
इथे राजकारण करू नका. हे त्यासाठी योग्य व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात या आणि माझ्यासोबत राजकीय लढाई लढा."
आंदोलकांनी जाधवपूर विद्यापीठातील घटनेचा उल्लेख केल्यावर ममता म्हणाल्या की, भाऊ खोटं बोलू नका. मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, पण या व्यासपीठाचा गैरवापर करू नका. जर तुम्हाला राजकारण करायचं असेल, तर बंगालला जा आणि तुमच्या पक्षाला मजबूत करा, मग आमच्याशी लढा."
आंदोलनकर्त्यांनी ओरडून बोलण्याचा प्रयत्न केल्यावर ममता म्हणाल्या की, 'माझा अपमान करून तुमच्या संस्थेचा अपमान करू नका. मी इथे भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तुमच्या देशाचा अपमान करू नका. तुम्ही मला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित केले आहे.
लक्षात ठेवा, 'दीदी' कोणालाही घाबरत नाही. 'दीदी' रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. मला पकडायचं असेल, तर पकडा!'
दरम्यान, आयोजक आणि उपस्थितांमुळे आंदोलनकर्त्यांना सभागृह सोडावे लागले. आयोजकांनी या अनपेक्षित घटनेसाठी त्यांची माफी मागितली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित श्रोते चकित झाले, मात्र मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या परखड आणि शांत प्रतिक्रियेस दाद देत त्यांनी टाळ्या वाजवल्या. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोजक आणि उपस्थित पाहुण्यांच्या विरोधामुळे सभागृह सोडावे लागले. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी भाषण विनाव्यत्यय पूर्ण केले.