Starlink Internet In India: प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक ही जगभरात प्रसिद्ध आहे. ही सेवा भारतात कधी सुरू होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आता ही प्रतिक्षा संपली असून भारतात देखील सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा शुभारंभ झाला आहे. अनेकांना ही इंटरनेट सेवा स्वस्त असेल असं वाटत होतं मात्र तसं नाहीये.
स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटनुसार भारतात स्टारलिंगचे प्लॅन्स हे ८ हजार ६०० रूपयांपासून सुरू होणार आहेत. एवढंच नाही तर हार्डवेअर किटसाठी युजर्सना तब्बल २४ हजार रूपये वेगळे भरावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे ही सेवा खरेदी केल्यानंतर तुम्ही स्वतः देखील सेटअप करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार सेटअप केल्यानंतर तुम्हाला स्टारलिंकची इंटरनेट सुविधा मिळण्यास सुरूवात होईल. कंपनीनं ३० दिवसांचा ट्रायल देखील दिला आहे.
स्टारलिंकचा दावा आहे की त्यांची सर्व्हिस ही ९९.९ टक्के अपटाईमसह येते. त्याचबरोबर कंपनीनं आमची इंटरनेट सेवा कधीही खंडीत होत नाही असा दावा देखील केला आहे. त्याचबरोबर कंपनीनं स्टेबिलिटीबाबत देखील मोठा दावा केला आहे. स्टारलिंकची इंटरनेट सेवा ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून अॅक्सेस करता येते. मस्क यांची ही इंटरनेट सेवा सॅटेलाईट बेस असल्यामुळं ते शक्य होतं असा दावा करण्यात आला आहे. मात्र सध्या तरी ही सेवा काही विशिष्ठ जागांवरच कार्यान्वित करण्यात आली आहे.
३० दिवसांच्या ट्रायल दरम्यान, युजर्सना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्लॅन आणि उपलब्धता चेक करू शकता. वेबसाईटवर लोकेशनप्रमाणे वेगवेगळे प्लॅन आणि प्रमोशन ऑफर्स तुम्ही पाहू शकता.
सध्या तरी स्टारलिंक फक्त घरगुती वापरासाठी इंटरनेट सुविधा पुरवत आहे. यासाठी कंपनी वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. Starlink चा Roam प्लॅन देखील आहे. याद्वारे युजर स्टारलिंक अँटिना कीट आपल्या सोबत घेऊन कुठेही जाऊ शकतात.
स्टार लिंकच्या अँटना हा कारवर देखील माऊंट करता येणार आहे. मात्र भारतात कंपनी कोण कोणत्या सुविधा ऑफर करणार आहेत याबाबत स्पष्टता नाहीये. मात्र दुसऱ्या देशात या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. स्टारलिंक इंडियाच्या वेबसाईटवर सेवेच्या उपलब्धतेसाठी तुम्हाला तुमचा पीनकोड द्यावा लागेल.