श्रीनगर: श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवार रात्री कोणीही कल्पना केली नसेल अशी घटना घडली. येथे झालेल्या एका भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. या स्फोटात सात जण ठार आणि सुमारे ३० जण जखमी झाले आहेत, अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा दिला आहे. दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यातून पोलिस आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी नमुने काढत असताना हा स्फोट झाला.
शुक्रवारी रात्री सुमारे ११.२२ वाजता हा स्फोट झाला. स्फोटाने पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला, अनेक वाहने जळून खाक झाली आणि ३०० फूट दूरपर्यंत लोकांच्या शरीराचे तुकडे विखुरलेले आढळले. आतापर्यंत ७ मृत्यूंची पुष्टी झाली आहे आणि ३० जखमी रुग्णालय़ात मृत्यूशी झुंज देत आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही लोक दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की आग आणि धुराचा लोळ आकाशात उंच गेला. बचाव पथकाला सतत होत असलेल्या छोट्या स्फोटांमुळे सुमारे एक तास पोलीस ठाण्यात प्रवेश करणे कठीण झाले होते.
सध्या तपास यंत्रणा या घटनेचा दोन प्रमुख कोनांतून तपास करत आहेत. असा अंदाज आहे की पोलीस ठाण्याच्या आत ठेवण्यात आलेल्या सुमारे ३६० किलोग्राम अमोनियम नायट्रेट स्फोटक सामग्रीमध्ये त्यावेळी स्फोट झाला, जेव्हा दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत ते सील केले जात होते. दुसरा आणि अधिक गंभीर कोन हा दहशतवादी हल्ल्याचा आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की परिसरात उभ्या असलेल्या जप्त केलेल्या एका कारमध्ये आयईडी लावला गेला होता, ज्याच्या स्फोटामुळे अमोनियम नायट्रेटच्या मोठ्या साठ्यात स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेल्या शैडो ग्रुप पीएएफएफ (PAFF) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे, ज्याच्या सत्यतेची तपासणी सुरू आहे.