प्रशांत वाघाये
Srinagar flight prices drop
नवी दिल्ली : उन्हाळ्याचे दिवस विशेषता एप्रिल अखेरपासून मे आणि जून महिना जम्मू-काश्मीरला फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात भारतासह जगभरातून अनेक पर्यटन जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी जातात. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमधून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानांचे दर कमी झाले आहेत तसेच रेल्वेगाड्यांमधूनही प्रवास करणारे पर्यटक कमी झाल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी एप्रिल अखेरीस आणि मे मध्ये मुंबई, दिल्लीसारख्या शहरातून श्रीनगरला जाण्याचे तिकीट जवळपास १०-१२ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त होते. तेच तिकीट आता २ दिवसांच्या पुर्वी काढले तरी ५-६ हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहे. तसेच वेगवेगळ्या एजन्सीद्वारे बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमामात रोडावली आहे. त्यामुळे कश्मीरमधील पर्यटन सुरक्षित करणे आणि परिस्थिती पूर्ववत करणे यासाठी तातडीने पावलं उचलणे आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
देशभरातील नागरिकांना जम्मू-काश्मीर पर्यटन करवणारे इद्रीस मिसार 'पुढारी'शी बोलताना म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला ही अतिशय दुखद घटना आहे. यात २६ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर जवळजवळ ९०% लोकांनी त्यांच्या बुकिंग्स रद्द केल्या. यामध्ये प्रवास, हॉटेल, तिथले पर्यटन अशा सर्व गोष्टींचा समावेश होता.
यामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्वच घटकांना मोठा फटका बसला आहे. काही दिवंसापुर्वी जिथे हॉटेलमध्ये रुम्स, मिळत नव्हत्या तिथे आता शुकशुकाट आहे. मात्र परिस्थिती हळूहळू रुळावर येत आहे. लवकरच सर्व पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे.
जम्मू काश्मीर पर्यटनाला गेलेले स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव 'पुढारी'शी बोलताना म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वी अनेक पर्यटक साधारण तीन-चार दिवस ते आठवडाभराचा वेळ काढून जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी आले होते. हल्ला झाल्यानंतर सर्वच लोक घाबरले होते त्यामुळे काहींनी आपापल्या गावी जाण्याचे ठरवले तर काही तिथे थांबले. तिथे थांबलेले पर्यटक साधारण शुक्रवारपासून जम्मू-काश्मीरमध्ये फिरत आहेत.
सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक आहे आणि जे पर्यटक आत्ता जम्मू-काश्मीरमध्ये आहेत ते पर्यटन करूनच परत जावे, या विचारात आहेत. प्रामुख्याने गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही सर्व पर्यटन स्थळे खुली झाली आहेत. आता विमानतळ किंवा रेल्वेस्थानकावर सामान्यपेक्षा थोडी कमी गर्दी आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्वाभाविकच देशभरातील नागरिकांमध्ये विशेषतः जे जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला जाणार होते, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या भीतीपोटी अनेकांनी आपला बेत रद्द केला. स्वाभाविकच विमान प्रवास किंवा रेल्वे प्रवासाची तिकीटेही रद्द केली. त्यामुळे वेगवेगळ्या भागांमधून जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणात घटले. आता मात्र ये-जा करणाऱ्या लोकांची संख्याच घटल्यामुळे प्रवासभाडेही कमी ओसरले.
मात्र हल्ला झाल्यानंतर दोन दिवसात देशभरातून अनेक लोक आपल्या नातेवाईकांना परत आणण्यासाठी कश्मीरला जाण्याचा प्रयत्न करत होते तर कश्मीरमध्ये अडकलेले लोक तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे विमानसेवेचे भाव गगनाला भिडले होते. विमानतळावर गर्दीही होती. मात्र केंद्र सरकारने, विशेषतः नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना भाव मर्यादित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर विमान प्रवासाचे भाव कमी झाले होते.