तामिळनाडूसह देशभरात खळबळ उडवून देणार्या चेन्नई येथील अण्णा विद्यापीठातील बलात्कार प्रकरणातील आरोपी ज्ञानशेखरन याला आज (दि. २) विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ज्ञानशेखरनला किमान ३० वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.न्यायाधीशांनी त्याच्याविरुद्ध सिद्ध झालेल्या ११ आरोपांपैकी प्रत्येकी ११ आरोपांबाबत शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी सांगितले की, शिक्षा एकाच वेळी भाेगाव्या लागतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मागील आठवड्यात चेन्नईतील महिला न्यायालयाने ज्ञानशेखरनला सर्व ११ आरोपांमध्ये दोषी ठरवले हाेते. तसेच आरोपी कागदोपत्री आणि फॉरेन्सिक पुराव्यांद्वारे सिद्ध झाल्याचेही स्पष्ट केले होते. शिक्षा सुनावणीपूर्वी ज्ञानशेखरन याने आईच्या खराब प्रकृतीचा हवाला देत दया दाखवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती फेटाळली.
ज्ञानशेखरन हा अण्णा विद्यापीठ कॅम्पसजवळ बिर्याणीचा स्टॉल चालवत होता. २३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री त्याने विद्यापीठ आवारात प्रवेश करुन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला तसेच पीडितेच्या मित्रावर हल्लाही केला होता. ज्ञानशेखरनने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि पीडितांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्याचा वापर केला. ग्रेटर चेन्नई पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती स्थापन केली होते. गुन्हा घडलले ठिकाण हे उच्च-सुरक्षा क्षेत्रातील राजभवन आणि आयआयटी मद्रास विद्यापीठ कॅम्पसजवळ होते. येते. पोलिसांनी कॅम्पसमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपी ज्ञानशेखरनला अटक केली होती.
बलात्कार प्रकरणी ज्ञानशेखरन याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या कार्यकर्त्यांसोबतचे फोटो समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते. भाजप नेते के. अन्नामलाई यांनी आरोप केला होता की ज्ञानशेखरन हे द्रमुक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी होते आणि त्यांनी द्रमुक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो शेअर केले होते. तामिळनाडूचे कायदा मंत्री एस. रेगुपती यांनी आरोप फेटाळून लावले होते, ज्ञानशेखरन हे पक्षाचे पदाधिकारी नाही, असे असे म्हटले होते. चेन्नईतील विद्यार्थिनी प्रकरणात अटक करण्यात आलेला व्यक्ती द्रमुकचा सदस्य नाही. तो द्रमुकचा समर्थक आहे, आम्ही ते नाकारत नाही, असे मुख्यमंत्री के. स्टॅलिन यांनीही विधानसभेत सांगितले होते.
ज्ञानशेखरन यांनी यापूर्वी पुराव्याअभावी आणि संशयावरून त्यांची अटक करण्यात आल्याचा दावा करत खटल्यातून मुक्तता मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. तामिळनाडू पोलिसांनी प्रति-याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले होते.मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर या पथकाने महिला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि तमिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदींनुसार ज्ञानशेखरन यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते.