Sonia Gandhi Book: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकाच्या प्रकाशनावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने हे पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. एका विशिष्ट भागात संपादकीय बदल करण्याची आणि काही मजकूर वगळण्याची मागणी प्रकाशकाने केली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी कोणत्याही प्रकारचे बदल किंवा मजकूर हटवण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला पुस्तकातील एका विशिष्ट भागाबाबत आक्षेप होता. त्या मजकुरात काही संपादकीय बदल करण्याची तसेच काही अंश वगळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकातील मजकुरात कोणताही बदल करण्यास नकार दिला. यानंतर पेंग्विनने भारतातील आवृत्ती प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मात्र, नेमका कोणता मजकूर हटवण्यास सांगण्यात आला होता किंवा पुस्तकातील कोणत्या भागावर प्रकाशकाचा आक्षेप होता, याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पेंग्विनने माघार घेतल्यानंतर या पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीचे प्रकाशन हक्क मिळवण्यासाठी इतर प्रमुख प्रकाशक पुढे आले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, हार्परकॉलिन्स इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशनाचा करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ असल्याचे सांगितले जात आहे.
भारताबाहेरील बाजारात हे पुस्तक 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेतील प्रकाशक अल्फ्रेड ए. नॉफ यांनी केली होती. नॉफ हा पेंग्विन रँडम हाऊसचाच एक विभाग आहे. पहिल्या टप्प्यात या पुस्तकाच्या तब्बल एक लाख प्रती छापण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली होती.
सोनिया गांधी यांनी यापूर्वीही पुस्तके लिहिली असली तरी, त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील सर्वात वैयक्तिक आणि प्रामाणिक कथन मानले जात आहे.
या पुस्तकात 1965 मध्ये केंब्रिज येथे राजीव गांधी यांची झालेली भेट, त्यानंतर नेहरू-गांधी कुटुंबात झालेला त्यांचा प्रवेश आणि कुटुंबासोबतचा वैयक्तिक प्रवास याचे वर्णन करण्यात आले आहे.
तसेच पुस्तकात संजय गांधी यांचे निधन, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या, त्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येचा काळ आणि या सर्व घटनांमुळे कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या वैयक्तिक वेदनांबाबतही उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला जनादेश मिळूनही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार का दिला, या त्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक निर्णयामागील कारणांवरही पुस्तकात भाष्य करण्यात आल्याची माहिती आहे.
पुस्तकाबाबत सोनिया गांधी यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले होते की, त्यांच्या कुटुंबाबद्दल मोठ्या प्रमाणात लिखाण झाले आहे. मात्र, कुटुंबातील सदस्यांच्या भावना, त्यांचे कार्य आणि त्यांच्या मानवी मर्यादांची खरी बाजू याची जास्त माहिती नाही.
त्यांच्या मते, ही कथा केवळ वैयक्तिक प्रवासापुरती मर्यादित नसून, गेल्या सहा दशकांत भारतात झालेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही वाचकांना देईल.
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने एखाद्या चर्चित पुस्तकाच्या प्रकाशनापासून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच वर्षात माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या ‘Four Stars of Destiny’ या पुस्तकावरूनही वाद निर्माण झाला होता. संसदेत राहुल गांधी यांनी या पुस्तकाची हार्ड कॉपी दाखवल्यानंतर पेंग्विनने आपण हे पुस्तक प्रकाशित केले नसल्याचे स्पष्ट केले होते.
तसेच जून महिन्यात प्रसिद्ध कादंबरीकार जो सॅको यांच्या मुजफ्फरनगर दंगलींवर आधारित ‘The Once and Future Riot’ या पुस्तकाचे प्रकाशनही रद्द करण्यात आले होते. कायदेशीर पडताळणी आणि नकाशातील सीमांशी संबंधित मुद्द्यांचे कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित पुस्तकातील नेमका कोणता मजकूर बदलण्याची किंवा हटवण्याची मागणी करण्यात आली होती, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पेंग्विनच्या नकारानंतरही या पुस्तकाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.