नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या शिष्टछाीला अखेर यश आले आणि सोनम वांगचुक यांनी गुरुवारी मध्यरात्री २६ दिवसांनंतर आपले उपोषण सोडले. त्यानंतर वांगचुक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विद्यार्थ्यांना उद्देशून एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला.
या संदेशात त्यांनी सरकारकडून मिळालेल्या लेखी आश्वासनांची माहिती देत, विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा एफआयआर दाखल होणार नसल्याची हमी मिळाल्याचे सांगितले. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही आश्वासन मिळाले नसल्याची कबुली देतानाच, विद्यार्थ्यांचे संरक्षण हेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याने उपोषण मागे घेतल्याचे वांगचुक यांनी सांगितले. सोनम वांगचुक यांनी दिलेला संदेश त्यांच्या शब्दांत...
सोनम वांगचुक म्हणाले, नमस्कार मित्रांनो, आज माझ्या उपोषणाच्या २६ व्या दिवशी मी तुम्हाला एक खास बातमी देत आहे. आता रात्रीचे १२ वाजून ३० मिनिटे झाली आहेत. थोड्यावेळापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह येथे रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत लढाच्या अपेक्स बॉडीतील नेतेदेखील उपस्थित होते. यापूर्वी विविध पक्षांचे तब्बल ६५ खासदार मला भेटायला आले. गेल्या दोन दिवसांपासून आमचे सरकारसोबत बार्गेनिंग आणि चर्चा सुरू होती; कारण आम्हाला केवळ तोंडी नव्हे, तर लेखी आश्वासन हवे होते. याला दोन दिवस लागले. अखेर त्यांनी लिखित आश्वासने दिली आहेत.
सरकारने आपल्या लिखित आश्वासनात सांगितले आहे, जे विद्यार्थी आणि तरुण जंतरमंतरवर शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत व जे २० जुलै रोजी संसद चलो मार्चमध्ये भाग घेत होते. त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई व एफआयआर दाखल करण्यात येणार नाही. या पेपर लीक प्रकरणांमुळे ज्या २० हुन अधिक निष्पाप विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या पीडित कुटुंबांना योग्य ती आर्थिक भरपाई दिली जाईल आणि तिसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, पेपर लीक रोखण्यासाठी व परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी देशाच्या संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल.
आता तुम्ही म्हणाल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काय झाले? तर त्यावर अद्याप सरकारकडून थेट आश्वासन मिळालेले नाही. त्यानंतर माझ्यासमोर दोनच रस्ते होते, एक तर मी आणखी काही आठवडे उपोषण सुरू ठेवून माझा जीव गमावला असता किंवा जिवंत राहून हा लढा पुढे चालू ठेवلا असता. पण तुम्ही सर्वांनी आणि डॉक्टरांनी मला नेहमी सांगितले की, माझा जीव महत्त्वाचा आहे आणि संघर्ष जिवंत ठेवणे गरजेचे आहे; पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर याची हानी सरकारलाच पोहोचेल. या छोट्याशा मुद्द्याला टाळून ते स्वतःची हानी करून घेत आहेत. राजीनामा दिला असता तर त्यांचे हे सर्व नुकसान थांबले असते; पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे हे होते की, आपल्या मुलांवर गुन्हे दाखल होऊ नयेत आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे. लढामध्ये एफआयआरमुळे मुलांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे मी जवळून पाहिले आहे, त्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य वाचल्याचा मला मनापासून आनंद आहे.