नवी दिल्ली: सोनम वांगचुक यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या त्यांच्या पत्नी गीतांजली जे अंग्मो यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सूचीबद्ध आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश लडाखला नोटीस बजावली होती. दरम्यान, लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे, २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांना राजस्थानमधील जोधपुर येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
वांगचुक यांना एकांतवासात ठेवण्यात आले नाही- तुरुंग अधिक्षक
सोनम वांगचुक यांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आले नाही आणि त्यांना कैद्यांना उपलब्ध असलेले सर्व अधिकार दिले आहेत, असे जोधपूर मध्यवर्ती तुरुंग अधीक्षकांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, तुरुंग अधीक्षकांनी म्हटले आहे की वांगचुक कोणत्याही दीर्घकालीन आजाराने ग्रस्त नाहीत आणि वैद्यकीयदृष्ट्या निरोगी आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत.
राज्याच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या कारवायांमध्ये वांगचुक सहभागी होते
लेहच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली की, राज्याच्या सुरक्षेला, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या कारवायांमध्ये सोनम वांगचूक सहभागी होते. खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.