Sonam Wangchuk CEC Gyanesh Kumar CJP protest : 'कॉकरोच जनता पार्टी'न; 'नीट-यूजी' (NEET-UG) पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले तेव्हा ही पार्टी 'कमकुवत' स्थितीत होती, तेव्हा त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. परंतु आता त्यांचा "आवाज बुलंद" झाला आहे आणि त्यांना आशा आहे की हा आवाज "देशाला हादरवून सोडेल", असा विश्वास व्यक्त करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाच्या आवाहनाला कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज (दि. २७) आपला पाठिंबा दर्शविला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून अंतर्गत मतभेदांच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, जर मुख्य निवडणूक आयुक्तांनी (CEC) राजीनामा दिला नाही, तर २ ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'ने केले आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईत होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आला आहे.
या आवाहनाला पाठिंबा देताना वांगचुक म्हणाले, "स्वच्छ निवडणूक प्रक्रिया ही देशाची सर्वात मोठी गरज आहे. मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो. देशातील उत्तरदायित्व आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा मिळायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
सोनम वांगचुक यांनी सांगितले की, "मी वैयक्तिकरित्या प्रत्येक चळवळीत सहभागी होऊ शकत नाही, परंतु माझा प्राथमिक पाठिंबा नेहमीच असतो. जेव्हा CJP कमकुवत होती, तेव्हा जंतरमंतरवर मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. आता त्यांचा आवाज बुलंद झाला आहे आणि मला आशा आहे की त्यांचा आवाज देशाला हादरवून सोडेल," असे पीटीआयशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.
"माझ्यासाठी चळवळींना पाठिंबा देण्यामागची मूळ संकल्पना ही आहे की त्या चळवळी स्वतंत्रपणे चालल्या पाहिजेत. त्यामुळे आता त्या मुद्द्यासाठी अनेक लोक पुढे आल्याचे पाहून मला आनंद होत आहे; म्हणूनच मला आशा आहे की मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (CEC) मुद्द्यावर माझी गरज भासणार नाही. महात्मा गांधींची जयंती असणारा २ ऑक्टोबर हा दिवस "अत्यंत पवित्र दिवस" असल्याचेही वाकंचूक यांनी नमूद केले.
'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी निवडणूक आयोगाच्या काही कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मतदार याद्यांची पडताळणी, नावे वगळणे किंवा नवीन नावे जोडणे आणि याद्यांची 'विशेष सखोल पुनरावृत्ती' (SIR) यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांनी आक्षेप घेतला होता.गेल्या १० महिन्यांत या दोन आयुक्तांनी तब्बल १४ वेळा औपचारिकपणे आपला विरोध दर्शवला असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ज्ञानेश कुमार यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. दरम्यान, निवडणूक आयोगाने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 'एसआयआर' प्रक्रियेशी संबंधित सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांनी एकत्र येऊन आणि एकमतानेच घेतले होते, असे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे.