Sonam Wangchuk hunger strike Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk hunger strike : "... तर उपोषण मागे घेईन" ; सोनम वांगचुक यांचे केंद्र सरकारला पत्र

मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली होती वांकचुक यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk hunger strike : पेपर फुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून उपोषण मागे घेण्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. "सरकारने आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही दडपशाही किंवा कायदेशीर कारवाई न करण्याचे ठोस आश्वासन दिल्यास मी माझे उपोषण मागे घेईन," असे स्पष्ट वक्तव्य वांगचुक यांनी केले आहे.

मंत्री नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली होती वांकचुक यांची भेट

केन्द्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली होती आणि उपोषण सोडण्याचे आवाहन केले होते. या भेटीनंतर वांगचुक यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे.

विद्यार्थ्यांवरील कारवाई टाळण्याची मागणी

'चलो संसद' मार्चदरम्यान पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर करूनही आंदोलक शांततापूर्ण मार्गाने लढले. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांवर सूडबुद्धीने किंवा सूड उगवणारी कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, असे वांगचुक यांनी पत्रात नमूद केले आहे.

तरुणांच्‍या भविष्याचा बळी देऊन मी उपोषण मागे घेऊ शकत नाही

देशभरातील विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ६५ खासदारांनी सोनम वांगचुक यांना पत्र लिहून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. "देशसेवेसाठी तुमची गरज आहे," असे खासदारांनी पत्रात म्हटले आहे. यावर उत्तर देताना वांगचुक यांनी पत्रात म्‍हटलं आहे की, "मला जगायचे आहे, माझ्या विद्यार्थ्यांकडे आणि शिक्षणाच्या कामाकडे परत जायचे आहे. पण ज्या तरुणांसाठी हे आंदोलन सुरू झाले, त्यांच्या भविष्याचा बळी देऊन मी उपोषण मागे घेऊ शकत नाही."

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री मिळाल्यास उपोषण मागे, अन्यथा बेमुदत आंदोलन

सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि कारवाई न करण्याची स्पष्ट खात्री दिल्यास उपोषण लगेच मागे घेतले जाईल. मात्र, तसे न झाल्यास उपोषण बेमुदत सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मागण्यांवर सकारात्मक चर्चेचे आश्वासन

पत्रात वांगचुक यांनी नमूद केले की, पेपर फुटीनंतर जीवन संपवलेल्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई देणे आणि या विषयावर संसदेत अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे (ज्यात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे), या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करेल असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या लोकशाहीचे भविष्य सरकारशी सहमत असणाऱ्यांशी कसे वागले जाते यावर नाही, तर जेव्हा देशातील तरुण धैर्याने आणि विश्वासाने बोलतात तेव्हा त्यांच्याशी कसे वागले जाते यावर अवलंबून असते, असेही वांगचुक यांनी म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT