Sonam Wangchuk Hunger Strike Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk: 'पोलिसांनी मारहाण केली आणि...', अभिजीत दीपकेने पोलिसांवर केले गंभीर आरोप, काय घडलं जंतर-मंतरवर?

Sonam Wangchuk Hunger Strike: 20 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवले. वांगचुक यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलकांनाही हटविण्यात आले आहे.

नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक 28 जूनपासून उपोषण करत आहेत. सलग 20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना आवश्यक उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला की, दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान आंदोलकांशी मारहाण केली आणि सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने तेथून हलवले. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

यापूर्वीही केला होता हल्ल्याचा दावा

यापूर्वी काल उशिरा रात्री अभिजीत दीपके यांनी आणखी एका पोस्टमध्ये असा दावा केला होता की, काही अज्ञात व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत वांगचुक यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

या दाव्यांबाबत अद्याप दिल्ली पोलिसांकडून किंवा अन्य अधिकृत यंत्रणेकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीकडे तसेच त्यांच्या आंदोलनाच्या पुढील घडामोडीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT