Sonam Wangchuk Hunger Strike Pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk Hunger Strike: 'प्रकृती खालावली, पण...', 18 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांचं देशवासीयांना मोठं आवाहन

Sonam Wangchuk Hunger Strike: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 18 वा दिवस असून त्यांनी प्रकृती खालावली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sonam Wangchuk Hunger Strike: शिक्षण आणि पर्यावरण संरक्षणासाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण 18 व्या दिवशीही सुरुच आहे. प्रकृती खालावत असतानाही त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करत देशभरातील नागरिकांना 20 जुलै रोजी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओत वांगचुक म्हणाले, "माझी प्रकृती चांगली नाही, पण इतकीही वाईट नाही. मला उपोषण सोडण्याची विनंती करण्यापेक्षा 20 जुलै रोजी संसदेकडे निघणाऱ्या शांततापूर्ण मोर्चात सहभागी व्हा."

दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात वांगचुक सहभागी झाले असून, NEET परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातही हे आंदोलन सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपोषण सुरू असल्यामुळे वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांची तब्येत खालावत असल्याचे वृत्त समोर येत असले, तरी त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून आपला निर्धार कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लेखक, कलाकार, अर्थतज्ज्ञ, अभिनेते आणि विविध राजकीय नेत्यांनी वांगचुक यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे. प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय, अभिनेते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, अभिनेता ओमी वैद्य तसेच अर्थतज्ज्ञ जयती घोष यांनी संयुक्त निवेदन जारी करून वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, "देशातील विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्यासाठी तुम्ही अत्यंत धैर्याने हा लढा उभारला आहे. मात्र पुढे मोठा संघर्ष करण्यासाठी तुमचे नेतृत्व आणि तुमचे आरोग्य दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृपया उपोषण मागे घेण्याचा विचार करा."

दरम्यान, वांगचुक यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयात तातडीच्या वैद्यकीय हस्तक्षेपासाठी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना तातडीने उपचार मिळावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मात्र, या सर्व घडामोडींनंतरही सोनम वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी पुन्हा एकदा समर्थकांना 20 जुलै रोजी होणाऱ्या संसद मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि अहिंसक ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगत, आपल्या प्रकृतीपेक्षा आंदोलनाच्या उद्दिष्टाला प्राधान्य असल्याचा मेसेज त्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT