Honeymoon Murder Case : देशभरातील बहुचर्चित ‘हनीमून मर्डर केस’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. २३) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाने तिला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
सोनम हिला कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन आणि तो निर्णय कायम ठेवण्याचा मेघालय उच्च न्यायालयाचा निर्णय घेतला होता. याविरोधात मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने सोनम रघुवंशी हिचा जामीन रद्द केला. तसेच तिला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
सोनमला जामिनावर मुक्त ठेवल्यास या प्रकरणातील सुरू असलेल्या खटल्याच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत सहा महिन्यांच्या आत खटला पूर्ण झाला नाही, तर सोनम खटला चालवणाऱ्या न्यायालयाकडे (ट्रायल कोर्ट) जामिनासाठी अर्ज करता येईल, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.
मेघालय हायकोर्टाने सोनमचा जामीन कायम ठेवताना म्हटले होते की, अटकेच्या कागदपत्रांमध्ये वारंवार अस्तित्वात नसलेल्या 'कलम ४०३(१)' चा उल्लेख करणे हे पोलिसांचा निष्काळजीपणा दर्शवते. एकापाठोपाठ एक मुख्य कागदपत्रांमध्ये हीच चूक होणे हे टायपिंगची चूक मानून दुर्लक्षित करता येणार नाही.
१२ मे २०२५ रोजी सोनम आणि राजा रघुवंशी यांचा विवाह झाला होता. २३ मे रोजी मेघालयात हनिमूनसाठी गेलेले असताना नवविवाहित दाम्पत्य बेपत्ता झाले. २ जून रोजी (बेपत्ता झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी) पूर्व खासी हिल्स येथील 'वैसावडॉन्ग धबधब्या'जवळील खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. ८ जूनपर्यंत बेपत्ता असलेली सोनम वाराणसी-गाझीपूर महामार्गावरील एका ढाब्याजवळ सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि तिचा २१ वर्षीय प्रियकर राज कुशवाह यांनी कट रचून राजा रघुवंशीचा खून केला. या हत्येतील मुख्य संशयित आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ७०० हून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, हा खून पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.