Punjabi influencer Manjeet Kaur  File Photo
राष्ट्रीय

Influencer Manjeet Kaur: झाडाला बांधून जिवंत जाळलेली इन्फ्लुएन्सर ७ आठवड्यांची गर्भवती होती; पोलिसांची माहिती

प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मंजीत कौर (वय २८) चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे तिला जाळण्यात आले तेव्हा ती सात आठवड्यांची गर्भवती होती

मोहन कारंडे

Influencer Manjeet Kaur

चंदीगड: प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मंजीत कौर (वय २८) चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे तिला जाळण्यात आले तेव्हा ती सात आठवड्यांची गर्भवती होती, असे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. ३ जुलै रोजी ही घटना घडली होती.

गंभीररीत्या भाजल्यामुळे उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी चंदीगडमधील 'पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च' (PGIMER) मध्ये कौरचा मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल दोन महिन्यांनंतर मनजीतच्या आईच्या तक्रारीवरून चंदीगड पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता 'शुभी' आणि 'पिंडा' अशी नावे असलेल्या दोन संशयितांचा शोध घेत आहेत.

झाडाला बांधून जीवंत पेटवलं

मनजीत कौरची आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ आणि ४ जुलैच्या मध्यरात्री मनजीतच्या दोन ओळखीच्या व्यक्तींनी तिला चंदीगडच्या सेक्टर ३४ मध्ये भेटायला बोलावले. तिथे तिच्यावर हल्ला करून तिला बळजबरीने गाडीत बसवले आणि मोरिंडाच्या जंगलात नेले. तेथे तिला एका झाडाला बांधून पेटवून दिले आणि आरोपी पसार झाले. यानंतर तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीने घटनास्थळी पोहोचून ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. मनजीतला सुरुवातीला मोरिंडा आणि नंतर मोहालीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला चंदीगडच्या 'पीजीआयएमईआर' रुग्णालयात हलवण्यात आले होते.

रुग्णालयात कित्येक आठवडे मनजीत बेशुद्धावस्थेत होती. ५ ऑगस्ट रोजी तिला थोड्या वेळासाठी शुद्ध आली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार कुटुंबाला सांगितला. मात्र, वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तिची प्रकृती खालावत गेली आणि २६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

७ वर्षांचा मुलगा, घटस्फोट आणि लिव्ह-इन...; पोलिसांनी काय सांगितलं?

या घटनेनंतर सेक्टर ३४ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शादी लाल यांनी सांगितले की, मृत मनजीत हिचा घटस्फोट झाला होता, तिच्या पश्चात सात वर्षांचा मुलगा आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, मनजीत संशयितांपैकी एकासोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान कौरला शुद्ध आली होती आणि तिने आपला जबाब नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती शुद्धीवर असून जबाब देण्याच्या स्थितीत असल्याची माहिती PGIMER पोलीस चौकीने खरार सदर पोलिसांना दिली होती. ही माहिती तपास अधिकाऱ्यालाही देण्यात आली होती, परंतु ते रुग्णालयात पोहोचले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT