Dog Attack Video Pudhari
राष्ट्रीय

Dog Attack Video: सहा महिन्यांच्या बाळावर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला; काठीने मारूनही सोडलं नाही, मालक मात्र शांत, VIDEO पाहून हादराल

Sonipat Pitbull Attack Video: हरियाणातील सोनीपत येथे पिटबुल कुत्र्याने अवघ्या सहा महिन्यांच्या बाळावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sonipat Pitbull Attack Video: हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिक्का कॉलनी परिसरात एका पाळीव पिटबुल कुत्र्याने सहा महिन्याच्या बाळावर अचानक हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, बाळाला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांना काठीने कुत्र्याला दूर करण्याचा प्रयत्न करावा लागला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला आहे.

एक महिला सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जात असताना पिटबुल कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. हल्ल्यामुळे महिलेचा तोल गेला आणि ती बाळासह जमिनीवर पडली. त्यानंतर कुत्र्याने बाळाला दातांनी पकडले. महिलेने आणि परिसरातील नागरिकांनी बाळाला सोडवण्यासाठी आरडाओरड करत मदत मागितली.

कुत्र्याला बाळापासून दूर करण्यासाठी काही नागरिकांनी काठ्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कुत्र्याने बाळाला सोडले नाही. अखेर नागरिकांच्या प्रयत्नांनंतर बाळाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रोहतक येथील पीजीआयमध्ये बाळावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पिटबुल बाळावर हल्ला करताना दिसत आहे. बाळाला वाचवण्यासाठी महिला मदतीसाठी ओरडताना दिसते, तर आजूबाजूचे नागरिक कुत्र्याला दूर करण्यासाठी धडपड करताना दिसतात.

या संपूर्ण घटनेत कुत्र्याच्या मालकाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हल्ला सुरू असताना मालक तुलनेने शांत आणि रिलॅक्स अवस्थेत दिसत असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत पुन्हा चर्चा

या घटनेनंतर लहान मुलांच्या आसपास पाळीव आणि आक्रमक स्वभावाच्या कुत्र्यांना ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेतली जाते का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर काही जणांनी कुत्र्याच्या आक्रमक वर्तनामागे भीती, तणाव किंवा इतर कारणे असू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर अनेकांनी लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पाळीव प्राण्यांच्या मालकांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त केली आहे.

सहा महिन्यांच्या बाळावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी बाळाची प्रकृती आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT