Siwan AK-47 Firing Case : बिहारमधील सीवान जिल्ह्यात २५ जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस शिपायाकडून AK-47 रायफलचा वापर झाल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत बिहार सरकारने सीवानचे पोलीस अधीक्षक (SP) पूरण कुमार झा यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. या घटनेत गोळीबार करणाऱ्या शिपायाला आधीच निलंबित करण्यात आले असून, घटनेदरम्यान सीवानचा प्रभार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अद्याप नवीन पदस्थापना देण्यात आलेली नाही. पूरण कुमार झा यांना सध्या नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत (वेटिंग फॉर पोस्टिंग) ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्लीतील 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) संचलित आंदोलनाशी संबंधित निदर्शनांवर पोलिसांनी अतिबळाचा प्रयोग केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीदरम्यान बिहार सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केले.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात बिहार सरकारने स्पष्ट केले आहे की, आंदोलकांनी घेरल्यामुळे आणि स्वतःचा बचाव करण्यासाठीच संबंधित पोलीस शिपायाने AK-47 मधून हवेत चार फेऱ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात कोणताही आंदोलक जखमी झालेला नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जुलै रोजी सीवान येथील जेपी चौकाजवळ घडली. आंदोलकांनी घेरल्यामुळे पोलीस शिपायाने बचावासाठी AK-47 मधून हवेत ४ राऊंड फायर केले.या AK-47 च्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, त्यादिवशी पोलीस कारवाईदरम्यान इतर ३ आंदोलक किरकोळ जखमी झाल्याचे सरकारने मान्य केले आहे.
सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, जे तीन आंदोलक जखमी झाले होते, ते शिपायाने गोळीबार केलेल्या ठिकाणी उपस्थितच नव्हते. त्यामुळे त्यांच्या दुखापती या AK-47 च्या चार फेऱ्यांमुळे झालेल्या नाहीत.याशिवाय, हाथी चौकाजवळ गर्दी पांगवण्यासाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) निलेश कुमार सिंह यांनी आपल्या ९ मिमी पिस्तूलमधून दोन फेऱ्या झाडल्याचा उल्लेखही या प्रतिज्ञापत्रात आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अत्यंत संयम बाळगला असून कोणताही अतिरिक्त बलप्रयोग केला नाही, असे सरकारने न्यायालयात स्पष्ट केले.
"विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी तैनात असलेल्या एका सामान्य पोलीस शिपायाला AK-47 सारखे अत्याधुनिक शस्त्र कुणी आणि कोणत्या शस्त्रागारातून (आर्मरी) दिले? हे शस्त्र देण्याची परवानगी कोणी दिली होती? AK-47 सारखे घातक शस्त्र सोपवण्यामागील संपूर्ण कमांड चेनची सखोल चौकशी होणार का?", असे सवाल बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केले आहेत.